Wednesday, April 1, 2020

महिपतगड-सुमारगड-रसाळगड पदभ्रमण - एक स्वप्नपूर्ती


 महिपतगड-सुमारगड-रसाळगड पदभ्रमण - एक स्वप्नपूर्ती
-- सौरभ जोशी

रसाळ-सुमार-महिपत ही दुर्गत्रयी प्रत्येक डोंगरभटक्याला नेहमीच खुणावणारी...या वाटेवर जाऊन या गिरिदुर्गांच्या अंगाखांद्यावर बागडणं कित्येक वर्षांपासून मनात होतं..तसंच महिपतगड आणि सुमारगड यांच्या कुशीत विसावलेल्या बेलदारवाडी या गोंडस गावाबद्दल आणि सुमारगडाच्या गर्द रानवाटेवर एकटाच राहणारा राया धनगर आणि त्याच्या झापाबद्दल मनात बरंच कुतुहल होतं..पण योग येत नव्हता...२-३ वेळा काही अपरिहार्य कारणांमुळे बेत ठरवून देखील रद्द करावा लागला...पण या दुर्गराजांनी शेवटी माझी बालमुखातली हाक ऐकली आणि बोलावा धाडला..आणि योग आला चक्रम हायकर्स या माहेरच्या माणसांबरोबर ही दुर्गभ्रमंती करण्याचा...मग काय म्हणता? ते दुग्धशर्करायोग, मणिकांचनयोग, सोने पे सुहागा, वगैरे सगळंच झालं...

निघालो मग २६मे च्या रात्री...खेडजवळील वाडी जैतापुर मार्गे बेलदारीच्या रस्त्यास लागलो...तेव्हा कळलं की, वाडी जैतापूर ते वाडी बेलदार हा आता गाडरस्ता होतोय..ते पाहून मनात संमिश्र भावनांचं रसायन तयार झालं...एकदा वाटलं, च्यायला आता या आसमंतातले रुख भुईसपाट होणार, गाड्या-घोडे येणार, गर्दी वाढणार, कचरा होणार..पण त्याचवेळी असंही वाटलं, की वाडी बेलदार हे कुठल्या कोपच्यातलं गाव..साधं रोज लागणारं जिन्नस आणायचं तर दोन आडीच तासाची पायपीट करून खाली वाडी जैतापुरास या, आणि परत तीन साडेतीन तासाची चढाई करून जा, असले भरमसाठ कष्ट...काही दुखलं खुपलं तर अडीच तास खाली उतरून पुढे वीसेक किमी खेड शिवाय चांगली वैद्यकीय सेवा नाही...मग या बेलदारकरांनी असंच राहावं का? तेव्हा उमगलं की या रस्त्यामुळे गावकर्यांचे कष्ट वाचतील, हे ही नसे थोडके...असो..

दोनेक तास
चालल्यावर माझं पहिलं कुतुहल माझ्यासमोर उभं राहिलं...

वाडी बेलदार...नावंच किती छान..एका बाजूस महिपताचा एक दांड, मागल्या बाजूस त्याच्याच अजस्र अंगाचा झाडोरीनं इंच इंच शाकारलेला एक भाग, अन् एका बाजूस पार सुमारगडापर्यंत जाऊन भिडणारं अफाट जंगल...आणि या सगळ्यात अख्ख्या हिरव्या गालिच्यावर मणी मांडून ठेवावेत अशी बेलदारकरांची घरटी...

सिताराम जाधवांच्या घराच्या पडवीत जरा विसावलो, पाणी जरा घोटलं, आणि महिपताच्या दांडावरून निघालो...रात्रीचा मुक्काम पारेश्वराच्या मंदिरात करायचा होता...सह्याद्रीतील पाहता क्षणीच मनाला भुरळ पाडणार्या काही थोडक्या जागांपैकी ही एक...आजूबाजूस जिथं आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथं आणि तिथपर्यंत किर्र जंगल..आणि मधल्या मोकळ्या जागेवर
पारेश्वराचं मंदीर..पुढ्यात विहीर...अशा विलोभनीय ठिकाणी आज राहायचं या आनंदात आम्ही सारे...


..पण लवकरंच लक्षात आलं की महिपताच्या मनात वेगळंच होतं...वैशाख सरून गेलेला..तेव्हा गडावरल्या दोन्ही विहिरीतलं पाणी सूर्यानं आग ओकून संपवून टाकलेलं...राहणार कसं?...मन भलतं हिरमुसलं...गड फिरून परत खाली वाडी बेलदारीत उतरण्याशिवाय उपाव नव्हता...काय करणार? निसर्गदेवतेची ईच्छा...ती शिरसावंद्य...पाठपिशव्या उचलून बेलदारीच्या वाटेस लागलो...

वाटेत एका कड्यावर जानकर धनगरणीच्या झापाशी टेकलो...एवढाल्या आसमंतात ही आणि तिचं ४-५ वरुसाचं पोर
येकुटवाणे राहतात...सोबतीस कोण? तर २-३ गुरं, एक कुत्रं...आणि महिपतगडाचा पहारा...तिचं ते निर्भीड जीवन पाहून फार कवतिक वाटलं आणि स्त्रीस अ'बला' का म्हणतात हा प्रश्न पडला....तसंच Miss World, Miss Universe, Miss Woman इ. किताब या जानकर धनगरणीसारख्या हिरकण्यांना दिले तर त्या किताबांची शोभा अधिक वाढेल,असा विचार माझ्या मनाला चाटून गेला इतकंच...!!


धनगरणीस विचारलं "पाणी कुठलं तुम्हास?"...तसं म्हणाली "गडावरचं.."...मी म्टटलं "कुठलं गडावरचं?"...म्हणाली "इहिरीतलं.." मी विचारलं, "विहिरींना तर पाणी नाही, मग कनचं पानी?"...त्यावर या बाईसाहेब सहज म्हणाल्या, "बराबर हाय तुमचं...उद्यांच्याला जाईन आन् इहिरीत थोडं खनंल...आन् मंग थोडकं पानी गावंल...."...मी सुन्न झालो हे ऐकून...पाण्यासाठी माणसाला किती कष्ट करायला लागावेत? त्याला काही सीमा? पण हे वज्र लीलया पेलत ही धनगरीण सहज म्हणते की थोडं खणलं की पाणी गावेल...बाथरूम मध्ये जाऊन नळ सोडला की पाणी मिळणार्या आणि ते वाया घालवणार्या शहरी सुखवस्तूंना हे विदारक वास्तव दाखवायला हवं...असो.

तिला नुसतं "ताक आहे का?" विचारायचा आवकाश, तिनं दोन हंडे ताक आमच्यासमोर आणून ठेवलं...त्या ताकाची लज्जत सांगण्यासाठी वाणी, वैखरी आणि लेखणी, सार्याच असमर्थ आहेत. महिपताच्या पारेश्वर मंदीरात न राहता आल्यामुळे झालेल्या मानसिक हिरमोडीतून या ताकाच्या भुरक्यांनी आम्हाला बाहेर काढलं, आणि काही वेळातंच बेलदार वाडीत परत आलो.

मावळतीस सोनेरी रंग देऊन भानुराज वसुंधरेच्या दुसर्या गोलार्धावर उगवतीच्या छटा देण्यास निघून गेले, आणि इथे लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया काजव्यांच्या रुपात आमच्यासमोर रुखारुखातून चमचमायला लागली. विजेची लाट जावी तसा लक्ष लक्ष काजव्यांचा लखलखाट रानातून सरकत होता...ते एकमेवाद्वितीय दृश्य डोळ्यांत साठव साठव साठवलं आणि जाधवमामांच्या पडवीत परतलो.

रात्री पडवीतंच पथार्या टाकल्या आणि निद्रादेवीनं कधी गारूड केलं कळलंच नाही...मध्यरात्रीत एका झोपेवर जाग आली, नकळत डोळे उघडले...मघाची झाडांमधली चमचम आता आकाशात दिसत होती..निद्रादेवी कोटी कोटी चांदण्यांचं आमच्यावर पांघरूण घालून गेली होती...निसर्गाची ती अद्भुत किमया झोपूनंच न्याहाळण्याचा तो कोण अलौकिक आनंद..!!

पहाटे साडेचारला उठलो..आज खूप मोठा पल्ला होता...सुमारगडावर जाऊन पुढे रसाळगडापर्यंत जायचं होतं..त्यामुळे सकाळी सहाला आवरून निघालो.

गावात पाण्याचं इतकं दुर्भिक्ष होतं की गावातल्या प्रत्येक माणसास सध्या दररोज फक्त दोन हंडे पाणी मिळतंय..इतकं असूनही जाधवमामांच्या घरच्यांनी मागं पुढं पाहिलं नाही आणि आम्हाला पाणी देऊ केलं...आम्ही म्हटलं "पाणी कमी आहे तर तुम्हाला असू द्या.."...त्यावर जाधवमामी म्हणाल्या "आवं, तुमी लई दुरून आल्यात, आमच्याकडं पावनं म्हनून आल्यात..आन् तुमासनी पानी बी न द्यून कसं चालंल? तुमी घ्या पानी...आमी बगून घेऊ.." ही अशी दणकट माणूसकी पाहिली की राकट सह्याद्रीच्या पोटातलं खळाळणारं निर्झर पाणी दिसायला लागतं. आम्हालाच गुन्हेगारासारखं वाटलं आणि कमीत कमी पाणी घेऊन सुमारगडाची वाट धरली.

तासाभरानं अनेक वर्ष ज्याबद्दल कुतुहल मनात होतं त्या राया धनगराच्या झापाशी आलो. इतक्या दूरस्थ आणि अडनिड्या
जागी हा इसम येकटा राहतो. आजूबाजूस जंगल म्हणजे बोलता सोय नाही. काळोखात स्वतःचा हात समोर धरला तरी दिसायचा नाही...अशा जागी एकट्यानं राहाणं हे ऐर्यागैर्याचं काम नव्हे..धन्य तो राया. तीच वाट पकडून झाडोरीतून पुढे सरकत होतो.


या वाटेची रूपं तरी किती सांगावीत? कधी पडवीत खेळणार्या अल्लड मुलीसारखी निरागसपणे धावणारी, तर कधी काट्याकुट्यातून नेऊन अंग ओरबाडणारी...कधी रानवेलींमधून चालताना कधीच सहवास संपू नये असं भासवणार्या प्रेयसीसारखी, तर कधी डोंगराच्या आडदांड सोंडेवर चढताना नाकात दम आणणारी..कधी पैठणीच्या काठासारखी नीटस, तर कधी कशीही बेशिस्तपणे भरकटणारी...कधी ठळक दिसणारी, तर कधी गर्द राईत लपलेली...अशी या वाटेची नाना रूपं अनुभवंत एकदाचे गुर खिंडीत आलो..नाष्टा केला आणि सुमारगडाकडे कूच केलं.

गडावर जाताना वाटेत एक खूप अरुंद वाटेचा ट्रॅव्हर्स लागतो..सुमारगडाच्या पोटातूनंच जातो तो..तिथून पाठपिशव्या घेऊन जाणं धोक्याचं. म्हणून त्या ट्रॅव्हर्सच्या आधीच पाठपिशव्या काढून ठेवल्या आणि पाण्याच्या बाटल्या फक्त पिट्टूत घालून निघालो.


"उगवतीच्या कड्यावरील झाडाच्या खाली आलेल्या मुळीस धरून येंगावं लागतं.." असं दुर्गमहर्षी गो.नि.दांनी केलेलं सुमारगडावरील चढाईचं वर्णन किती यथार्थ आहे. पण आता त्यात मुळीच्या ऐवजी शिडीस धरून येंगावं लागतं, असा बदल झाला आहे. शिडीवरून चढून कड्याच्या बाजूबाजूने चढत जाऊन अखेरीस गडमाथा गाठला.

गडावर मुबलक पाणी, खांबटाकी, वाटेत ४-५ भुयारं, पडके अवशेष. सारा गड फिरलो. बेलदारवाडीतून जो पल्ला चालत आलो, तो निरखला. डोळ्यांवर विश्वास बसेना. केवढालं ते अंतर, केवढालं ते जंगल, किती ते वाटेत डोंगर ज्यांना वळसे घालत घालत आलो. पण सुमारगडानं त्याच्या माथ्यावरून जो नजारा दाखवला त्यांनं सगळे कष्ट कुठल्या कुठे विरून गेले. केवढा तो मुलुख...
महाबळेसरापासून ते मधू-मकरंदगडापर्यंत, खेड पासून ते परबत-चकदेवापर्यंत, आणि वासोट्यापासून ते नागेश्वरापर्यंत सारा पट सह्याद्रीनं मांडून ठेवलेला. तो मनसोक्त निरखला आणि गडावरून उतरणीस लागलो.


पुढील लक्ष रसाळगड...अजून खूप मोठा पल्ला. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचं आता चटके देणार्या उन्हात रुपांतर झालेलं..जोडीला भयंकर चिकचिकाट..पण सांगणार कोणाला? रसाळगडाच्या हाकेला "ओ" दिलेली..उन्हाची पर्वा न करता पावलं उचलली...रेटली...आणि गुर खिंडीत आलो..जठराग्नि शांत केला..जरा हायसं वाटलं.

आमच्या वाटदर्शक मामांना विचारलं, "हिकून किती येळ लागंल रसाळगडी जायास?"...मामा म्हणाले "अजून लई लांब हाये त्यो.."

हे मामा म्हणजे शारिरीक काटकतेचा मेरुमणी होते...
नाव सिताराम तुकाराम पवार.
राहणार वाडी बेलदार.
उंची साधारण साडेपाच फूट.
बांधा अतिशय सडपातळ.

मामा खूप वयस्कर दिसत होते. म्हणून सहज त्यांना त्यांचं वय विचारलं...."आसंल आता ऐंशीच्या पुढं..." असं सांगत त्यांनी त्यांच्या पिशवीतून election card काढून माझ्या हातात दिलं आणि म्हणाले, "ह्ये पघा आन् लावा काय त्यो हिसोब.." मी पाहिलं ...त्यात लिहिलेलं "१-१-१९९५ रोजी वय ६४ वर्षे.." म्हणजे आजमितीस त्यांचं वय ८७ वर्षांचं आहे हे उमगल्यावर मला चकवा यायचाच बाकी होता
...८७ वर्षांचा म्हातारा (??), छे छे तरुणंच, आम्हाला बेलदारवाडीपासून ते सुमारगडमार्गे रसाळगडापर्यंत वाट दाखवायला आला होता..पायात फाटकी स्लीपर, डोक्यावर मळकट टोपी, शिवलेली हाफ पँट, अंगात लांब बाहीचा शर्ट, आणि पाठीवर पिशवी आणि आमच्यासाठी वाहिलेलं ५लि. पाणी...खरं सांगतो, हा उलगडा झाल्यावर माझी मला लाज वाटली...काय माणसं आहेत ही...मामांना दंडवत घालून रसाळगडाच्या वाटेस लागलो.


उन्हाचा तडाखा आता फारंच वाढलेला. पण वाट अधूनमधून दाट जंगलातून जात असल्याने पायपीट सहनीय होती. मध्येच इतकी गच्च झुडपं लागत की वाट दिसेनाशीच व्हायची. मग आमचे तरुण मामा दिशेचा अंदाज घेऊन कुठल्यातरी झाडोरीत घुसंत आणि काही वेळानं हाक देत.."या हो.."..की मग आमचा कबिला त्या दिशेला जाई. असं ३-४ वेळा झालं असेल. मागे सुमारगड दिसेनासा झाला, पण अजून रसाळगडाचं काही दर्शन होत नव्हतं. तो अजून बरंच दूर होता असा याचा अर्थ होता. बर्याच वेळानं गचपणातून बाहेर आल्यावर एका टेपाला वळसा घातल्यावर रसाळगडाचं केव्हापासनं हवं असणारं दर्शन झालं. गडावरचं झोलाईदेवीचं मंदीरदेखील लख्ख दिसत होतं. तोच आमचा रात्रीचा मुक्काम असणार होता.

रसाळगड दिसल्यावर झालेल्या

आनंदाबरोबरंच अजून केवढा मोठा पल्ला गाठायचाय याची जाणीवही झाली आणि नकळत पायात बळ येऊन पावलं झपझप पडू लागली. गडाच्या आलिकडील तीन भल्या मोठाल्या दांडांच्या माथ्यावरनं उतरत उतरत रसाळगडाच्या खिंडीजवळ येऊन पोचलो. यापुढील रस्ता ठळक होता. त्यामुळे मामांनी वाट दाखवून दिली आणि म्हणाले, "मी हिथनं परत फिरतो"...मामांना मनोमन धन्यवाद दिले आणि जड मनाने रामराम करून रसाळगडाच्या खिंडीकडे चालते झालो.


अर्ध्या तासातंच खिंडीस बिलगलो. खिंड चढून रसाळगडाच्या उत्तरेस असणार्या पेठवाडीत उतरलो. इथून साधारण २५० पायर्या येंगल्या की थेट गडमाथाच...त्या चढलो..स्वागतालाच गडानं तोफ ठेवलेली...जणु आमचं स्वागत गडानं अदृश्य आणि अश्राव्य अशा तोफधडाक्यानं केलं...गडाच्या दरवाजात डोकं टेकलं आणि झोलाई देवीच्या मंदीरात जाऊन पडलो..

आवारात समोरंच रेखीव दीपमाळ, बाजुला पाण्याचे दोन मोठे तलाव..पूर्वेस पार परबत-चकदेव पर्यंतचा प्रदेश आणि पश्चिमेस मावळतीचं आकाश...मुक्कामास या सुखाव्यतिरिक्त अजून काय आणि कशाला हवं?

रात्री पिठलं भातावर ताव मारला, सवंगड्यांशी गप्पागोष्टी झाल्या...आपल्या अंगाखांद्यावर सुरक्षितपणे बागडू दिल्याबद्दल महिपत-सुमार-रसाळगडांचे आभार मानले, आणि नेहमीच देहभान विसरायला लावणार्या प्रिय सह्याद्रीस पुन्हा मनोमन नमन करून चांदण्यात पहुडलो...या दुर्गत्रयीच्या भ्रमंतीची केव्हापासून मनी बाळगलेली तमन्ना वास्तवात उतरली होती..त्या समाधानात डोळ्याला डोळा कधी लागला ते कळलंच नाही.

गीताताईच्या बैठकीचा रसास्वाद

गीताताईच्या कालच्या बैठकीच्या निमित्ताने...

एखाद्या शांत संध्याकाळी आपण एका देवराईत बसलोय, पाखरं त्यांच्या घरटी बसून किलबिलाट करतायत, कसलीतरी अनामिक ओढ मनात संमिश्र भावनांचे हेलकावे आणतेय, त्याचवेळी एका अदृश्य झर्‍याचा खळखळाट ते हेलकावे शांत करतोय, मधेच खवळलेल्या समुद्रातील वादळानं उफाळणार्‍या लाटा दिसतायत, त्यांना शमवणारी ऋषितुल्य ओंकारासारखी राऊळघंटा ऐकू येतेय, आणि काही अमृतस्वर मखमली मोरपीसांनी आपल्याला कुरवाळतायत, हे सारे अनुभव एकामागोमाग येणं म्हणजे कालचं गीताताईचं गाणं..!

रागंच असा बेफाट निवडलेला की बास...!! ललितागौरी....!! अस्तास जाणार्‍या सूर्याबरोबर मनात उत्पन्न होणारी हुरहूर दाखवणारा गौरीतला कोमल ऋषभ, आणि ती झटकणारा उगवतीच्या नवक्षितिजावरची झळाळी दाखवणारा ललतचा मध्यम, यांचा मिलाफ गीताताईनं असा काही दाखवला, की "वाह, क्या बात है, बहोत अच्छे..!!" अशी दाद नकळत जात होती. सुरुवातीच्या आलापीने एखाद्या अचल पर्वताची ऊंची आणि खंबीरता समोर उभी केली...आणि मग त्याच पर्वतातून उगम पावलेली नदी खळाळत यावी तशी "प्रीतम सैया" ही पारंपरिक बंदिश गीताताईनं अप्रतिम सादर केली. गंभीर सागरात हळूहळू उभवत गेलेली लाट पुढे पुढे सरकत किनार्‍याला येऊन भिडावी, तसा "प्रीतम सैया"तल्या "सै" वरच्या पहिल्या समेचा वेध  गीताताईनं असा काही घेतला की, सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे ती देवराईतली राऊळघंटा थेट रसिकांच्या हृदयात वाजली. तो निनाद अजूनंही हृदयात रुंजी घालतोय. त्यानंतरची "तोरी सावरी सुरत मन भायी" ही मध्य लय त्रितालातली चीज म्हणजे सुभानल्ला...!! काठ पदराची पैठणी नेसून नानाविध अलंकार लेवून लडिवाळपणे त्या कान्ह्यावरचं प्रेम दाखवणारी राधा गीताताईच्या स्वरास्वरात दिसत होती. ताना, बोलताना, सरगम यांच्या महिरपी ओलांडत सातव्या मात्रेपासून वजनदारपणे उठाव घेणारी ही बंदिश गीताताईनं काय पेललीय...!! वा वा.

खवळलेला समुद्र शांत होऊन त्याची धीर-गंभीरता प्रत्ययास यावी तसा ललितागौरी नंतर गीताताईनं पेश केलेला चंद्रकौंस. सा गं म धं नि या फक्त पाच स्वरांमधून हा धीर-गंभीरतेचा माहोल उभा करणं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हे. त्यासाठी "देता किती घेशील दो कराने" असा अथांग स्वरसागर उभा करणार्‍या विदुषी शुभदाताई पराडकरांसारख्या गुरु आणि त्या स्वरसागरात अनंत डुबक्या मारून स्वरमोती वेचणारी गीतताईसारखी शिष्या, असं मेतकूट जमावं लागतं. हे मेतकूट गीताताईच्या कालच्या चंद्रकौंसातील स्वरास्वरातून, श्रुतीश्रुतीतून, आणि मात्रेमात्रेतून चाखायला मिळत होतं. गुरु विदुषी शुभदाताईंनीच बांधलेल्या "ए करतार" (विलंबित रूपक) आणि "एरि मै जानू" (मध्य लय एकताल) या बंदिशी गीताताईनं मांडल्या. आहाहा....!! "ए करतार" मधला साडे सहाव्या मात्रेवरचा उठाव घेऊन रुपकची सातवी मात्रा भेदून सम गाठायचा काय तो डौल...!! तसंच "एरि मै जानू" मधली एकतालातली दहाव्या मात्रेवरुन उचल घेऊन छेडलेली सम काय वर्णावी...!! काय ती पेशकश, काय ती नजाकत, काय तो ठेहेराव...केवळ शब्दातीत…!!! अफाट ताकदीच्या, कसलेल्या आणि ज्ञानी गुरुकडून मिळालेल्या भक्कम पायावर एखादा शिष्य त्याच्या अपार आणि प्रामाणिकपणे घेतलेल्या मेहनतीने कसं उत्कृष्ट स्वरशिल्प उभारू शकतो याची मूर्तिमंत अनुभूती गीताताईनं कालच्या तिच्या चंद्रकौंसातनं दिली.

त्यानंतरचा खमाज मधला टप्पा म्हणजे ताना, बोलताना यांची सौंदर्यपूर्ण आतषबाजी करत पश्तो या तशा अनवट तालाशी खेळलेला लालित्यपूर्ण खेळ होता. वेगवान तानांमधला दाणेदारपणा अबाधित ठेवून, स्वराला जराही इकडे तिकडे हलू न देता, मात्रेमात्रेवरची हुकूमत कायम ठेवण्याचं अचाट कसब गीताताईनं लीलया दाखवलं. त्यात बारा वर्ष गुरु विदुषी शुभदाताईंकडून घेतलेले सौंस्कार क्षणोक्षणी प्रतिबिंबीत होत होते.

मग रसिकांकडून नाट्यसंगीताची फर्माईश आली. त्याला गीताताईनं "नाथ हा माझा"नं उत्तर दिलं. यमनचे कुरुवाळणारे अवीट स्वर, शुभदाताईंनी देऊ केलेलं ऋषितुल्य सौंस्कारांचं लेणं, आणि गीताताईचा गोड गळा या तीन भरजरी वस्त्रांची ती परिटघडी होती. यमन आणि "नाथ हा माझा" मधील बारीक बारीक जागांची स्वररत्न त्या परिटघडीतून गीताताईनं अलगदपणे उलगडवून दाखवली. आमच्या corporate क्षेत्रात "succession planning" नावाचं एक तत्व आहे. त्यानुसार बाल गंधर्व आणि माणिकताईंच्या नंतर "नाथ हा माझा" रसिकांना त्याच तोडीने ऐकवण्यासाठी देवी सरस्वतीनं गीताताईला या भूतलावर पाठवलंय असं मला नेहमी वाटतं. यात कुठलीही अतिशयोक्ति नाही. ज्यांनी गीताताईचं "नाथ हा माझा" ऐकलंय त्यांना मी म्हणतोय ते पटेल.

कुठल्याही चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. त्याप्रमाणे शेवटी भैरवीचा आर्त आलाप गीताताईनं घेतला. "कैसी ये भलाई" ही चीज आणि त्यानंतर घेतलेल्या द्रुत लईतील तराण्याने एखाद्या घरंदाज बैठकीच्या गाण्याची सांगता ज्या दिमाखात व्हायला हवी तशीच झाली. आपण आयुष्यात अनेक बैठकीच्या मैफिली ऐकतो, जागतो. पण एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील अशा अगदी थोडक्या बैठकी असतात, ज्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात चिरंतन घर करून राहतात. कधीही मनात येईल तेव्हा तो कप्पा उघडावा, त्यातील स्वरपुष्प हळुवारपणे काढावीत, पुन्हा अनुभवावीत आणि त्या कप्प्यात परत अलगद ठेवून द्यावीत....अगदी तस्सच झालं कालचं गीताताईचं गाणं.......!!

-- सौरभ जोशी

Tuesday, March 31, 2020

मुंबई पुणे आगगाडीचा प्रवास - एक सदाबहार अनुभव

मुंबई पुणे आगगाडीचा प्रवास - एक सदाबहार अनुभव
-- सौरभ जोशी

लहानपणी आजोळी जाण्याच्या निमित्ताने मुंबई - पुणे हा प्रवास आगगाडीने करण्याची वेळ बर्याचदा येत असे. पुढे आजी-आजोबा जसे ठाण्याला आले, तसं एकूणच पुण्याला जायच्या फेर्या कमी झाल्या आणि आगगाडीने जायचं तर दूरंच राहिलं.

पण आज बर्याच वर्षानी आगगाडीने पुण्याला जायचा योग येतो, नव्हे, तो मी आणतो. अगदी जाणूनबुजून आणतो. लहान मूल पहिल्यांदाच आगगाडीने प्रवास करण्यापूर्वी जसं हौसतं, तसा मी हौसतो. चार -पाच दिवस आधीपासून पुण्याला आगगाडीनं जायचंय असा मी घोषा लावतो. स्वत:च्या कारनं किंवा थेट बोरिवली - स्वारगेट बसनं न जाता मुद्दाम मी दादरहून सकाळच्या डेक्कन एक्सप्रेसने जायचं ठरवतो.

झालं...डेक्कन एक्सप्रेसचं खिडकीच्या सीटचं मी आरक्षण करतो. भल्या पहाटे उठून दादर स्टेशन मी अगदी गाडीच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच गाठतो. गाडी कधी एकदा स्टेशनात शिरतेय याची मी अगदी परळच्या दिशेने डोळे लावून अधीरतेने वाट पाहतो. मग दूरवर गाडीचं इंजीन दिसू लागतं आणि मला कोण आनंद होतो...आरक्षित केलेल्या खिडकीच्या सीटवर जाऊन मी बसतो, गाडी सुरू होते....आणि कधी एकदा कल्याण मागे टाकतोय असं होतं...कारण त्यापुढेच खर्या अर्थाने सह्याद्रीच्या संगतीनं आगगाडीचा प्रवास सुरू होतो.

बदलापुर, वांगणी आलं की जुन्या सवंगड्यांच्या भेटीची ओढ लागावी तशी मनाला सह्याद्रीतील दुर्गमित्रांच्या भेटीची ओढ लागते...आणि पहिली दृष्टीभेट होते ती चंदेरीशी...मी मनातूनच साद घालतो आणि खुशाली कळवतो... नेरळ येतं..लगेच दृष्टी पाठीमागच्या पेब किल्ल्याकडे जाते आणि त्याच्या अंगाखांद्यावर बागडून केलेली मनमुराद भटकंती आठवते. त्याच्याच बाजूला उभवलेलं माथेरानचं पठार मनाला भुरळ घालतं. नेरळ मागे लोटताना माथेरानला जाणारी निळ्या रंगाची इटुकली ट्रेन दिसते का याचा नकळत डोळे शोध घेतात.....आणि ती दिसली की लहानपणी जसा आनंद होत असे तसा तो मला आजही होतो.

मग हळूहळू जिभलीला पाणी सुटायला लागतं. कर्जतवरनं जणू हवेबरोबरंच वाहत आलेला बटाटावड्यांचा खमंग वास कर्जतला वडे वाट पाहत आहेत याची ग्वाही देतो..! कर्जत स्टेशनात गाडी थांबते. बटाटेवडे खात खात लक्षं लागतं ते गाडी कधी बरीकशी मागे-पुढे होते याकडे. कारण असतं, गाडीला मागच्या बाजूने अजून एक इंजिन लागण्याचं. ही moment मी आजही अगदी लहान मूल होऊन जगतो.
     
कर्जतहून गाडी सुटते...आणि मग काय पुढे आनंदाचा गाभाच..!! का काय विचारता? अहो, पुढे "कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी" या ओळी गुणगुणवायला लावण्यासाठी खंडाळा घाट असतो. मग तात्काळ डब्याच्या दाराकडे धाव घ्यायची आणि गार वारा अंगावर घेत सह्याद्रीचा पसारा मनसोक्त न्याहाळायचा.

आता ओढ लागलेली असते ती पहिल्या बोगद्याची. कारण तिथपासून पुढे २६ बोगदे बकायदा मोजायचे असतात. ते कधी कमी भरतात, तर कधी जास्त...पण ते मोजायची हौस मात्र १०० टक्क्यांपेक्षा तसूभरही कमी होत नाही...आणि कधी जर बरोब्बर २६ भरले तर तो आनंद आजही माझ्या गगनात मावत नाही..!! मी आता माझा नसायला सुरुवात झालेली असते.

मी आता दारातून सारखं मागे-पुढे पहायला लागतो. कुतूहल असतं ते, वळणावरनं गाडी जाताना पुढचं आणि मागचं इंजिन दिसतं का ते पहायचं..! बाकदार अळीसारखी ती गाडी आणि तिची ती पुढे-मागे अशी २ इंजिनं दिसली की अहाहा...काय ती मौज...त्यातून अगदी बाकदार वळणावर छोटा बोगदा आला की, बोगद्यातून पलीकडे पुढे गेलेले डबे, मग बोगद्यात गायब झालेली गाडी, अलीकडे गाडीचे बोगद्यात न गेलेले डबे, आणि सर्वात पुढे आणि मागे एक-एक इंजिन, असं मोठं गमतीदार दृश्य दिसतं...आणि मी खुळा होतो.

मग अनेक बोगद्यांतून बाहेर आल्यावर आपण केवढे उंच आलो आहोत याचा अचानक साक्षात्कार होतो ते बाजूस दिसणार्या  उल्हास दरीकडे पाहून..!! मध्येच दरीवर बांधलेले पूल, एकापाठोपाठ एक बोगदे, बोगद्यांमधील काळा कुट्ट काळोख, आत असलेले पिवळ्या रंगाचे दिवे, घाटातल्या चेक पोस्टवर लाल-हिरवा बावटा घेऊन उभा असणारा लाइनमन, मधुनंच एखादं लोणावळ्याला गाडीला सोडून परत कर्जतकडे मोठ्ठा भोंगा मारत आणि खणखणाट करत उतरणारं एकटंच इंजिन...हे सारं काही मला आजही मोहिनी घालतं..!

घाटातनं जाताना दरीच्या पलीकडे दिसणारे श्रीवर्धन आणि मनरंजन हे राजमाचीचे दोन बालेकिल्ले, पलीकडे कुसुरचं पठार, ढाक-बहिरीचा डोंगर, त्याला बिलगलेला कळकरायचा सुळका, मांजर दबा धरून बसलंय असा भास देणारा मांजरसुंभाचा डोंगर असा सगळा सह्याद्रीनं मांडलेला पट डब्याच्या दारातूनच निरखणं म्हणजे क्या बात है...!! सगळच खुळावणारं...संमोहनात टाकणारं...हृदयाला भिडणारं आणि जिव्हाळ्याचं...या सगळ्यांना मी मनातूनच नकळत मुजरा घालतो......पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर या सार्या  मंडळींकडे पाहताना वाटतं की, खरंच आपले मावळे यातनं चढता-उतरताना दिसले तर काय बहार येईल...या विचारांत माझी समाधी कधी लागते ते माझं मलाच कळत नाही...कारण आता मी अजिबात माझा राहिलेला नसतो.

बघता बघता खंडाळा येतं. खंडाळा स्टेशनचं तिकिटघर तिथं उल्हास व्हॅली आणि इतर अनेक ट्रेक्सच्या निमित्ताने काढलेल्या रात्रींची आठवण करून देतं. तिथं रात्री म्हटलेली धम्माल गाणी, टाकलेले पत्त्यांचे डाव, बाहेर धुवाधार पाऊस चालू असताना स्लीपिंग बॅगमध्ये गुरगुटून काढलेल्या रात्री, स्टेशनजवळ असलेल्या प्रथमोपचार केंद्राच्या पडवीत रात्री झोपलो असताना तिथे एका बाळाच्या जन्माच्या रडण्याने खसकन आलेली जाग आणि त्याच्या बापानं आम्हाला वाटलेले पेढे...सारं सारं मन:पटलावरून सरकायला लागतं आणि हसू येतं....मी त्या nostalgic ट्रान्समधून गचकन बाहेर येतो, तो चिक्कीच्या वासानं..!!...आणि मला कळतं, अरेच्चा!! लोणावळा आलं पण..!!
कर्जतचा बटाटावडा ते लोणावळ्याची चिक्की या २ बिंदूंत निसर्गानं आणि आठवणींनी माझ्यावर अलौकिक आनंदाची पखरण केलेली असते. त्यातून बाहेर यावसंच वाटत नाही.

गाडी लोणावळ्यातनं बाहेर पडली की मग मुंबई - पुणे रस्ता दिसायला लागतो. त्यावरची धावणारी वाहनं पाहून "ए, आपली झुकझुकगाडी बघ किती फास्ट जातेय" असं मी माझं मलाच सांगतो..!! या आनंदात लोहगड-विसापूरची जोडगोळी कधी दिसायला लागते ते कळंतंच नाही. मग हळुहळु "ते शहर पुणे, तेथे काय उणे" याची चाहूल लागायला लागते.

अशा या सार्या अवीट प्रवासाच्या आठवणी मी मनाच्या पेटीत बंद करीतंच पुणे स्टेशनवर उतरतो. मी पक्कं ठरवतो की, परत मुंबई - पुणे आगगाडीनं नक्की यायचं....मन विचारतं "कशाला?"...मी मनाला म्हणतो, "अरे वेड्या मना, खुळं होण्यासाठी रे..लहान मूल होऊन झिंगण्यासाठी रे...वय विसरण्यासाठी रे..!"

माझ्या आठवणीतलं नाडसुर

माझ्या आठवणीतलं नाडसुर 
-- सौरभजोशी

परवा काही जुने फोटो पाहताना नाडसूरच्या घराचा फोटो समोर आला आणि मन एकदम तीस-एक वर्ष मागे गेलं. नाडसुरशी आणि तिथल्या घराशी निगडित अनेक आठवणी मन:पटलावर जिवंत झाल्या.
उगवतीस पार लोणावळ्यापासून निघालेल्या बेलाग सह्याद्रीची कोराईगड, मृगगड, अनघाई, तैल-बैला, भोजा डोंगर, धनगड, सुधागड अशा दुर्गरत्नांनी नटलेली कातळभिंत, अन मावळतीस सरसगडाचा पहारा. त्यात जोडीस वाघजई घाट, गवळण घाट, पायमोडी घाट, सवाष्णे घाट, घोड दरा, बोरप्याचा दरा अशा घाटावरून कोकणात उतरणाऱ्या एक सो एक घाटवाटांची रेलचेल. अशा श्रीमंत सह्याद्रीच्या देखरेखीत वसलेलं, भोरच्या पंत प्रतिनिधींचं संस्थान असणाऱ्या सुधागडाच्या पायथ्याशी वसलेलं नाडसूर हे टुमदार खेडं म्हणजे आमचं मूळ गाव.
दो-चौ पैस वाडे, पाच-सहा बावड्या, तेवढीच राउळं, सत्तर-ऐंशी कौलारू घरं आणि दोन इटुकल्या शाळा, एवढाच काय तो गावाचा पसारा. लहानपणी सुट्टीत आणि काही निमित्ताने अधेमधे नाडसुरी जाणं होई. त्यात या परिसराशी जी नाळ जुळली, ती कायमचीच. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडण्याची गोडी लावली ती सुधागडानं. पाच वर्षांचा असताना कृष्णाच्या खांद्यावर थोडावेळ बसून, थोड्या वेळ चालत सुधागडी गेल्याचं स्मरतंय. त्यानंतर नाडसुरला कधीही गेलं की सुधागडी चालत वर्दी लावणं नित्याचंच झालेलं.
आमचं घर देखील अतिशय आटोपशीर...दुपाखी...गोंडस...टुमदार…!! दाराशी राखणीला आंब्याचे दोन रुख. त्यांच्या बुंध्याजवळ त्यांच्या दोन खोडांच्या बेचकीत मारून ठेवलेली लाकडी फळी. तीस येंगुन आम्ही घराच्या अंगणात शिरत असू. अंगणात छोटंसं तुळशी वृंदावन. त्याच्या बाजूस छोटं खळं. त्यात दारच्या आंब्याची सुकलेली पानं पडत, जी आम्ही शेकोटीसाठी सरपण म्हणून वापरत असू.
घरात शिरल्यावर लगेच ऊजवीस छोटी खोली होती. ती तात्या धर्मे यांची. आम्ही त्यांना तात्या आजोबा म्हणायचो. तात्या आजोबा आमच्या आजोबांचे बालपणापासूनचे मित्र. त्यांना घर नव्हतं. म्हणून आजोबांनी ही खोली त्यांना राहायला दिली होती. आम्हा कुटुंबीयांपैकी नाडसुरी कोणी नसताना तात्या आजोबांकडून घराचा सांभाळ होत असे आणि त्यांना राहायला छत ही मिळत असे. या खोलीसमोर इंग्रजी L आकाराची मोठी पडवी होती. त्यात आजोबांची कापडाचा झुपका लावलेली आरामखुर्ची होती. बाजूला सागवानी झोपाळा. L च्या कोनाशी मला वाटतं आजोबांनीच तयार केलेली लाकडी फळ्यांची कॉट आणि त्यांनीच विणलेली खाट होती. स्वयंपाकघर आणि पुढची L आकाराची पडवी याना संलग्न असलेल्या भिंतीत एक खिडकी होती. स्वयंपाकघरात चूल, जिन्नस ठेवण्यासाठी एकावर एक मारलेल्या लाकडी फळ्या, एक फडताळ, आणि देवघर. चुलीच्या बाजूस जळणासाठीची फळकुटं आणि फुंकणी. स्वयंपाकघराच्या बाजूस माजघर होतं आणि त्यातून माडीवर जायला जुनाट लाकडी जिना होता. त्यावरून कोणी चढता-उतरताना धप्प धप्प असा आवाज येई. मागल्या पडवीत काही गाई-म्हशी होत्या. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही मुलं धारोष्ण दुधाचे मानकरी ठरत असू. एका फळीवर आमच्या पणजीनं कैक वर्षांपूर्वी केलेल्या लिंबलोणच्याच्या फोडी शिल्लक असलेली एक चिनी मातीची बरणी ठेवलेली असे. तिच्या हाताच्या चवीची आठवण म्हणून. दर खेपेस त्यातले बोट-बोट भर लोणचे आम्ही अगदी वर्षानुवर्ष पुरवून पुरवून चाखत असू.
जेव्हा गाडी नव्हती तेव्हा नाडसुरला जाणं हा दोन दिवसांचा कार्यक्रम असे. आदल्या रात्री ठाण्यास आत्याकडे राहायला जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहाची ठाणा-नाडसुर एसटी पकडायची. ती दहा-साडेदहा पर्यंत नाडसुरी पोचत असे. हा प्रवास कंटाळवाणा असला तरीदेखील हवाहवासा वाटणारा. ठाण्याहून एसटी सुटली की कधी एकदा ती पाली सोडतेय असं व्हायचं.
पालीपुढे दोन-तीन किमी झाले की डांबरी रस्ता संपत असे आणि एकवीस गणपतीच्या घुमटीपासून एसटी नाडसुरचा कच्चा रस्ता धरी. या रस्त्यावरच्या आठवणी देखील मनात घर करून आहेत. एकवीस गणपतीवरून पुढे आलं की डावीकडे एका दांडावर पुई नावाचं कातवड्यांचं गाव दिसे. तिथेच रस्त्याच्या बगलेस एक छोटी चौकोनी बाव होती. तिचं पाणी प्यायचं नाही कारण तीत नारू किड्याचे जंतू आहेत असं आजी सांगत असे. पुढे रस्त्यावर दो-चार मोऱ्या होत्या. त्यातल्या काहींवर साकव होते, तर काहींवरचे पडून गेलेले. त्यामधून एसटी अक्षरशः खालच्या दातपडी नदीच्या पात्रात उतरून परत वर चढत असे. अशा वेळी आम्हाला एसटीचालक हिरो वाटे आणि आपण एसटी ऐवजी झुलणाऱ्या बोटीत बसलोय की काय असा प्रश्न पडून उरात धस्सं होई.
नाडसुरचे खरे वेध लागत ते पायरीच्या धसेपासून. पुईच्या पुढल्या माळावरून एसटी दांडकळत गेली की ही धस लागे. धसेचा चढ बऱ्यापैकी अंगावरचा होता. पुढे आमची गाडी आल्यावर तिने या धशीतून जाताना आम्ही खाली उतरत असू आणि एका झटक्यात गाडी न बंद पडता धशीतून चढली की आपल्याला बाबा म्हणून किती कुशल सारथी लाभलाय या विचारानं ऊर भरून येई…!! धशीतल्या चढावरल्या वळणावर आंब्याचा एक भला थोरला वृक्ष होता. पूर्वी कच्चा रस्ता देखील नसताना आजोबा-बाबा-काका वगैरे पालीहून जिन्नस डोक्यावरून चालत वाहून आणताना या आमरुखाच्या सावलीत घटकाभर थांबून गूळपाणी घेत. धशीतून एसटी वर आली की एसटीच्या उजवीकडील खिडक्यांत येऊन आपलं घर दिसायला लागलं का, ते आम्ही निरखत असू....आणि ते दिसलं की आनंद गगनात मावेनासा होई. आता मात्र कधी एकदा घरी जाऊन झोपाळ्यावर बसतोयसं झालेलं असायचं. पण रस्ता अजून काही संपत नसे. पुढे धोंडश्याकडे जाणारा रस्ता उजवीस सोडला की एका छोट्या टेपावर वैतागवाडी नावाचं छोटं गाव लागे. गावाचं नाव देखील अगदी समर्पक होतं. इतका प्रवास करून आता वैताग आलाय असंच जणू काही ते सांगत असावं. बास....आता अगदी पाच मिनिटांचा वेळ उरला या जाणिवेनं सगळा शीण निघून जाई.
वैतागवाडीच्या पुढे अगदी काटकोनात एसटी उजवी घेऊन नागेश्वराच्या तलावाच्या काठाने नाडसुरात शिरत असे आणि एका हापशीजवळ थांबत असे. आम्ही मुलं अमुक अमुक तारखेस येतोय हे आई-बाबांनी आजीआजोबांना किंवा तात्या आजोबांना महिनाभर आधी पत्राने कळवलेलं असायचं. एसटी पायरीची धस चढून वर आली की तिचं पिवळट-मळकट टप आणि उडणारा धुरळा आमच्या घराच्या मागल्या पडवीतून दिसत असे. त्यामुळे आम्ही येण्याच्या तारखेस ठाणा-नाडसुर एसटीच्या वेळेस आजीआजोबा हा धुरळा कधी उडतोय याकडे डोळे लावून मागल्या पडवीत उभे असंत. हा धुरळा आणि एसटी दिसली की आजोबा किंवा तात्या आजोबा बाहेर हापशीवर आम्हास आणायास येत. नागेश्वराहून एसटी पुढे येऊन हापशीच्या अलिकडे तिनं डावी घेतली की उजवीकडे घराच्या मागल्या पडवीत आलेली आजी आम्हाला एसटीतून दिसत असे. तिला एसटीतून हात करत हाक मारायचा कोण तो आनंद…!! एसटीतून उतरून एका विहिरीला आणि एका मोडक्या शाळेला वळण घालून आम्ही घराकडे येत असू. आजी दारात पायावर दूध-पाणी घालण्यासाठी तांब्याभांडं घेऊन आलेलीच असायची....आणि घरात शिरल्यावर तर मग काय आनंदाचा गाभाच…!!!
आजी-आजोबांनी तात्याबा मोडकांस नातवंडं येणार असल्याचं आधीच सांगितलेलं असायचं. ते आदल्या दिवशी येऊन पडवीत झोपाळा बांधून जात. का? तर घरात शिरल्यावर आम्हा मुलांची पहिली उडी त्या झोपाळ्यावर असे. तात्याबांकडे बैलगाडी होती. आम्ही आलो की स्वतः बैलगाडी घेऊन यायचे. मग त्यांच्याबरोबर तास-दोनतास छानपैकी बैलगाडीची सफर होत असे. आम्हालाही हाकायला द्या ना, असा आम्ही त्यांच्याकडे हट्ट धरायचो. ते ही आम्हाला मग थोड्या वेळ बैलगाडी हाकायला देत असंत. फार मजा यायची. 
तात्या आजोबा माझ्यासाठी प्रत्येक खेपेस नवीन विटीदांडू बनवून ठेवत असंत. माझ्या आयुष्यात ज्यांनी मला विटीदांडू खेळायला शिकवलं आणि मी ज्यांच्याबरोबर आयुष्यात प्रथम विटीदांडू खेळलो ते तात्या आजोबा म्हणजे आम्हा मुलांचा नाडसुरातील वृद्ध बालमित्र…!! सडपातळ बांधा असला तरी एके काळचं त्यांचं कमावलेलं शरीर होतं. त्यामुळे ते आम्हा मुलांबरोबर अगदी लीलया खेळत. त्यांच्याबरोबर विटीदांडू खेळण्यातला आनंद आता परत येणे नाही.
नाडसुरच्या घरातील दिवेलागणीच्या वेळच्या आठवणीं मनात आल्या की वाटतं कालचक्र परत तीस-पस्तीस वर्ष उलटं फिरावं आणि ते क्षण पुन्हा अनुभवावेत. आजी बाहेर तुळशी वृंदावनात दिवा लावत असे आणि आम्ही मुलं शुभंकरोति म्हणून पुढल्या पडवीतल्या झोपाळ्यावर परवचा म्हणायला बसत असू. बाहेर तुळशीवृंदावनात तेवणारा मंद दिवा, आम्ही झोपाळ्यावर परवचा म्हणत बसलेले, समोर कापडाच्या आरामखुर्चीत आजोबा काही श्लोक म्हणत बसलेले, आत स्वयंपाकघरात आजी चुलीशी बसलेली, चुलीवर तापत ठेवलेला तवा, त्यावर भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्या, चुलीतील निखाऱ्यांवर फुंकणीतून फुंकर मारल्याचा बाहेर येणारा आवाज, देवघराशी कोणीतरी वडीलधारी - बाबा म्हणा, काका म्हणा - घंटा वाजवीत आरती करीत बसलेले, उदाधुपाचा येणारा सुगंध, हे सारं तीस-चाळीस वॉटच्या मंद दिव्यात, आणि घराबाहेर किर्र काळोख..!! फार छान मन:शांती होती ती. आज वाटतं की, तीच खरी श्रीमंती होती. ते पवित्र वातावरण, त्या लहरी आजच्या आमच्या लखलखीत दिव्यांनी उजळलेल्या घरांत नाही मिळू शकत....असो.
मग गावातली वडीलधारी मंडळी आजोबांशी गप्पा मारायला येत. त्यांत झोपाळा लावणारे तात्याबा मोडक असंत, आजोबांना अत्यंत मानणारे विष्णु आप्पा गुरव असंत, नाना द्रविड असंत. या सर्वांच्या गप्पा झोपाळ्यावर बसून ऐकण्यात एक वेगळीच मजा होती.
तात्या आजोबा साप पकडण्यात अतिशय पटाईत होते. त्यामुळे परवचा म्हणून झाल्यावर आम्ही त्यांना त्यांचे साप पकडण्याचे अनुभव सांगण्यास भरीस घालायचो. त्याचबरोबर त्यांच्या तोंडून भाऊ काणे या बहाद्दराची गोष्ट ऐकणे म्हणजे पर्वणी असे. तात्या आजोबा आणि आमचे आजोबाही सांगत की, भाऊ काणे हा एकेकाळी नाडसुरातला शक्तिमान माणूस होता. पूर्वी म्हणे रामोशांच्या टोळ्या गावावर दरोडे टाकीत असंत. पण भाऊ काणे गावात आहे असं समजताच रामोशी गावात येत नसंत. दर वेळच्या नाडसुरच्या खेपेत सापाच्या आणि भाऊ काण्याच्या गोष्टी आम्ही अगदी मन लावून ऐकत असू. तात्या आजोबा त्या अशा काही रंगवून सांगत की ऐकत राहावंसं वाटे.
बहिरी, भैरोबा आणि नागेश्वर महादेव ही नाडसुरची ग्रामदैवतं. बहिरीच्या मंदिराबाहेर जवळजवळ तीस-चाळीस किलोच्या भल्या मोठाल्या दगडी गोट्या होत्या. आजोबा सांगत की, पूर्वी गावात शक्तिमान गडी कोण, हे आजमावण्याकरता ह्या दगडी गोट्या एक एक करून उचलून उजव्या खांद्यावरून मागे फेकण्याची स्पर्धा लागे. घराच्या बाजूसंच एका छोट्या माळावर श्रीदत्ताचं आणि गणपतीचं मंदिर होतं. त्या मंदिरातून दिवेलागणीस छान घंटानाद येत. त्याच माळावर आम्ही विटीदांडू, बॅडमिंटन वगैरे खेळल्याचं ठळक आठवतंय.
आजोबांबरोबर किंवा तात्या आजोबांबरोबर आजूबाजूला भटकणं म्हणजे मजा असे. त्यात कोणगावचं धरण होतं, ठाणाळ्याची प्राचीन लेणी होती, सुधागड होता. आजोबांबरोबर दोन-तीन वेळा सुधागडी गेल्याचंही आठवतंय. त्या रस्त्यानं जाताना आजोबा त्यांच्या लहानपणीच्या किल्ल्याशी निगडित आठवणी सांगत. त्या आठवून आजही डोळे पाणावतात. किल्ल्यावरील भोराईदेवीच्या मंदिरात रोज पाठ वाचण्याची जवाबदारी पूर्वापार आमच्याकडे होती. आजोबा दोन-तीन वर्षाचे असतानाच त्यांचं पितृछत्र हरपलेलं. त्यामुळे हा पाठ वाचण्याची जवाबदारी साहजिकच एकुलत्या मुलावर म्हणजे आजोबांवर लहानपणापासूनंच आली. आजोबा सांगत की, त्यांची आई म्हणजे आमची पणजी त्यांना दातपडी ओलांडून सुधागडाचा जंगलातला चढ जिथून सुरु होतो, तिथल्या मारुती मंदिराशी सोडत असे. तिथून आजोबा एकटेच किल्ल्यावर जात आणि पाठ वाचून संध्याकाळपर्यंत परत नाडसुरी घरी येत. मुंज झाल्यावरचं सात-आठ वर्षांचं ते पोर जंगलातून येकुटवाणं किल्ल्यावर जात असे...माऊलीस मागे सारून...त्या वेळी त्या माऊलीची आणि आजोबांची मनस्थिती काय होत असेल याची कल्पना करवत नाही. पण नाईलाज होता. त्यातून चार पैसे मिळत कुटुंबासाठी.
वाटेतलं मालुसऱ्याचं टाकं, मधली मोठी शिळा, तिसरा महादरवाजा, वरती एका दगडी पायरीवर देवीच्या घोड्याच्या पायाचा उमटलेला खुर, असं सगळं आजोबा दाखवीत असंत. त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी सांगत. ते सारं श्रवणामृत वाटे. किल्ल्यावरील भल्या मोठ्या तलावास ते एका दमात पोहत सोळा फेऱ्या मारीत. त्यांचं पोहणं देखील प्रेक्षणीय असे. उजव्या कुशीवर झोपून, उजवा हात डोक्याखाली घेऊन फक्त डाव्या हाताने वल्ही मारल्यागत ते अतिशय सहजतेने, पाण्याचा एकही थेंब उडू न देता पोहत. तलावाच्या पलीकडच्या तीरावर जाऊन कंबरभर पाण्यात उभे राहून संध्या करीत, आणि परत तसेच पोहत अल्याड येत. खूप छान दृश्य असे ते.
नाडसुरचा दुसरा एक आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणजे धोरांड्यात जाऊन झाडावरची करवंदे खाणे, आणि शिवाय झोळीत भरून घरी आणून आजीस देणे. आजी मग ती अर्धी अर्धी कापून, तिखट मीठ लावून, चुलीवर भाजलेल्या भाकरीबरोबर जेवताना देत असे. ती चव जगातल्या कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमधील कुठल्याही महागातल्या महाग पदार्थांना येणे नाही. कारण त्यात तिखटमिठाबरोबर आजीच्या सुगरणहातांतुन तिचं आमच्यावरचं प्रेमदेखील स्रवलेलं असे.
नाडसुरला घराच्या मोरीत कधी अंघोळ केलेली मला स्मरतंच नाही. पडवीत एक दगडी होती आणि तिच्याजवळ एक दगडी पाटा होता. त्यावर उभं राहून दगडीतलं पाणी तांब्यानं धबाधबा अंगावर घेण्यातली मजा आज कुठल्याच स्विमिन्ग पूल मध्ये येत नाही. तसंच घराजवळच्या किंवा नाना द्रविडांच्या विहिरीवर जाऊन रहाटाने पाणी काढून रहाटाला लावलेला पोहऱ्या थेट डोक्यावर रिता करण्यातली मजा शब्दांत कशी वर्णावी?
अशी सगळी ही मजा संपायचा दिवस म्हणजे परत मुंबईला जायचा दिवस उजाडला, की नकोसं व्हायचं. सकाळची ठाण्याहून आलेली एसटी दिवसा पालीला एक-दोन खेपा मारून संध्याकाळी साडेचारच्या सुमारास परत ठाण्याला जाण्यासाठी नाडसुरी येई. ती पायरीच्या धशीशी आली की उडणाऱ्या धुराळ्यावरुन समजत असे. मग आम्ही घरातून सामान घेऊन निघत असू. असं वाटायचं की, एसटी येऊच नये आणि धुरळा दिसूच नये. पण तो क्षण यायचाच. एसटीत बसून निघालो की मन खट्टू होत असे. त्यात मागल्या पडवीत टाटा करायला आलेले आजी-आजोबा, तात्या आजोबा एसटीच्या खिडकीतून बघवलेच जात नसंत.
आज आता काळाच्या धुरळ्यात ही सारी मंडळी उडून गेलीयेत. त्यांच्या आठवणींची साक्ष देणारं ते घर आता पडक्या अवस्थेत उभं आहे. आज या साऱ्या आठवणींनी मी जरा हळवेला झालोय. पु.लं. नी ‘हरितात्या’ या कथेत म्हटल्याप्रमाणे पाठीला डोळे फुटावेत आणि मागे पडलेल्या काचांच्या तुकड्यांत असंख्य प्रतिबिंब लखलखावीत, तसे आजी,आजोबा, तात्या आजोबा, तात्याबा मोडक, अप्पा गुरव, नाना द्रविड इत्यादी प्रभृती दिसायला लागतात आणि वाटतं की, त्या उडालेल्या काळाच्या धुरळ्यातून ही मंडळी पुन्हा प्रकट व्हावीत आणि ते मंतरलेले दिवस पुन्हा अनुभवता यावेत.....!!
....पण वर्तमानकाळ लगेच मनाला दंश करतो, हसू ही येतं, रडू ही येतं....आणि एकंच वाटतं....
आहा..!! ते सुंदर दिन हरपले, मधुभावांचे वेड जयांनी जीवा लाविले....!!!