Sunday, April 12, 2020

राजगड ते शिवथरघळ - एका पुण्यभूमीवरून दुसऱ्या पुण्यभूमीवर

राजगड ते शिवथरघळ - एका पुण्यभूमीवरून दुसऱ्या पुण्यभूमीवर

-- सौरभ जोशी

पहाटे चारच्या सुमारास गुंजवणीत कोंबडं आरवलं. त्या आवाजानं डोळे किलकिले उघडले. रात्रभराच्या प्रवासाचा शीण, त्यामुळे स्लीपिंग बॅग मध्येच चुळबुळ चालू होती. सरत्या पौषाचा आठवडा. बाहेर बऱ्यापैकी असलेल्या थंडीमुळं गुरगुटून झोपावंसं वाटत होतं. शेवटी आळस झटकून उठलो आणि मंदिराच्या सभामंडपात झोपलेल्या सवंगड्यांना देखील हलवलं.

तांबडफुटी झाली. गुंजवण्याच्या दक्षिणेस पहुडलेली राजगडाची सुवेळा माची आणि तिच्या पूर्वेकडील असलेल्या तोंडाजवळचं नेढं लक्ष वेधून घेत होतं. पाखरं जंगलात किलबिलायला लागली. कुणी घरटी बांधायला काड्या-पानं आणायास तर कुणी त्यांच्या पिल्लांसाठी दाणापाणी वेचायास घरटी सोडती झाली. 

आम्ही देखील झरझर आवरायला लागलो. आजचा पल्ला तसा बराच होता. राजगडी जाऊन, अख्खा किल्ला पाहून पुढं कुंभळ्यापर्यंत मजल मारायची होती. पुरोहिताकडचा चहा मारला आणि फार वेळ न दवडता पाठपिशव्या पाठीस ठासून आम्ही चोरदिंडीच्या वाटेस लागलो.

सूर्याची कोवळी सोनेरी किरणं सुवेळावर सांडली. उजवीकडे बालेकिल्ला कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला. वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न होतं. गावातले बापे कंबरेस कोयती लावून शेतांच्या वाटांवर दिसू लागले. विहिरींवरील रहाटांचा कर्रकर्र आवाज गावातल्या आया-बहिणी पाणी भरण्यास आल्याचे दाखवत होता. गाव पूर्ण जागं झालं होतं.

गुंजवण्यातून चोरदिंडीकडे जाणाऱ्या वाटेवरील पहिल्या दांडास भिडलो. मी, गायत्री, पाणिनी, प्रणव, मकरंद आणि प्रीती असा जिवलगांचा चमू होता. त्यामुळे गप्पा गोष्टी करत, हसतखेळत मार्गक्रमण चालू होते. गुंजवणी आणि कानंदीचं खोरं आता सूर्यप्रकाशात लख्ख दिसत होतं. पहिला दांड चढून टेपावर आलो. डावीकडे राजगडाच्या सुवेळा आणि पद्मावती माचीच्या मधल्या अजस्र अंगावर पसरलेली गच्च रानराई, दोहींच्या वरच्या अंगास अचल असा बालेकिल्ला, पश्चिमेस तोरणा, त्याच्या झुंझार आणि विशाळा माच्यांना घेऊन मिरवत उभा, तर उजवीस उत्तरेकडे दूरवर पसरलेल्या ढगांच्या दुलईतून डोकी उभवणारे सिंहगड, पुरंदर-वज्रगड. न्याहारीसाठी याहून सुरेख जागा कशास हवी? 

गायत्रीला तिच्या पाठपिशवीतुन बांधून आणलेली न्यहारी काढायला सांगितली. पाच-एक मिनिटं पाठपिशवीत शोधून गायत्रीला साक्षात्कार झाला की न्याहारीची पिशवी खाली गुंजवण्यातंच राहिलीय. बोंबला….!! आता काय करायचं? प्रणवने त्याच्या स्टाईलमध्ये तिला सोलली. पण तिला सोलून लागलेली भूक थोडीच भागणार होती? परत खाली तासभर उतरून जाणं शक्तीच्या दृष्टीने असलं तरी वेळेच्या दृष्टीने परवडणारं नव्हतं. झाक मारत बरोबर आणलेली बिस्किटे, चकल्या इत्यादींवर वेळ मारून नेली आणि चालते झालो. 

चोरदिंडीच्या अलीकडे अंगावर येणाऱ्या सोंडेचा चढ सुरु झाला. दमछाक तर होत होतीच. पण शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली राजगडाची पवित्र भूमी एका अनामिक ओढीनं खेचत होती. मधले कातळटप्पे पार करून चोरदिंडीत आलो. चोरदिंडीच्या दगडास डोकं टेकलं आणि किल्ल्यात शिरते झालो. पद्मावतीच्या तलावाबाजूनं चढून माचीवरच्या आई पद्मावतीच्या मंदिराशी येऊन थांबलो. दर्शन घेतलं आणि लागलीच निघालो. 

सदर, दारूखाना मागे टाकून बालेकिल्ला, सुवेळा आणि संजीवनी यांच्याकडे घेऊन जाणाऱ्या वाटांच्या तिठ्याशी पोचलो. तिथं एक पोरगं ताक विकायला आलेलं. त्याला विचारलं “खुटून पावला?” तशी म्हणाला “भुतोंड्यावरच्या वाटेवर ढिब्यांचा धनगरवाडा हाये, थितून आलू.” आम्हाला पुढे भुतोंडेमार्गेच कुंभळ्याला जायचं होतं. त्यामुळे त्याला सांगितलं की आम्हाला भुतोंड्याच्या वाटेला जाता जाता लावून दे. चालेल म्हणाला. “आम्ही बालेकिल्ला आणि सुवेळा पाहून येतो. साधारण दोन-अडीच तासांनी इथेच या तिठ्याशी भेट” असं त्याला सांगून आम्ही लागलीच बालेकिल्ल्याची वाट धरली.             

उजवीकडे बालेकिल्ल्याचा कातळकडा, डावीकडची
दरी दाट जंगलानं शाकारलेली, तीत लपलेला गुंजवणे दरवाजा, पूर्वेस भक्कम तटबंदीच्या कवचकुंडलांनी सजलेला सुवेळा माचीचा दांड, आणि माथ्यावर झाडोरीची महिरप, अशी बालेकिल्ल्याकडे नेणारी गोजिरी वाट. बालेकिल्ल्याच्या दरवाज्याशी पोचलो. कमानीतून सुवेळा निरखली. सह्याद्रीत अशी काही ठिकाणं आणि त्यावरून दिसणारी दृश्य आहेत, जी कितीही वेळा पहिली तरी दर वेळी मिळणारा आनंद तसूभरही कमी होत नाही. राजगडाच्या  बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्याची कमान हे अशा ठिकाणांपैकीच एक आणि तीतून होणारं सुवेळा माचीचं होणारं दर्शन हे अशाच मनाला भुरळ पाडणाऱ्या दृश्यांपैकी एक…!!

बालेकिल्ल्यावरच्या अष्टमीच्या चंद्राच्या आकाराच्या तळ्यावर जरा विसावलो, मागे असलेल्या महादेवाच्या मंदिरात शिवशंकराचं दर्शन घेतलं, उजवीकडे असणारा बुरुज पाहिला. त्यावरून दिसणारी पद्मावती माची, पलीकडे वेल्हे, साखर, विंझर पर्यंतचा मुलुख डोळ्यात साठवला, पलीकडे दिसणाऱ्या सिंहगडास साद दिली आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर आलो. चहूबाजूस ताशीव कडे, पूर्वेस चकाकणारं भाटघर जलाशयाचं पाणी, दक्षिणेस पार महाबळेश्वर-रायरेश्वर-मधुमकरंद गडापर्यंत पसरलेल्या सह्याचलाच्या रांगा, पश्चिमेस अनुपम स्थापत्यशास्त्राचा मेरुमणी म्हणून शोभणारी संजीवनी माची, त्यापल्याड तोरण्याच्या बुधला-विशाळापर्यंत जाऊन टेकलेली मळवाट, आणि उत्तरेकडे कोंढाणा असा सह्याद्रीनं चहू बाजूस मांडलेला विस्तीर्ण पट....तो डोळ्यात साठवला आणि बालेकिल्ल्यावरून उतरणीस लागलो. पुन्हा तिठ्याशी येऊन सुवेळाची वाट धरली. डुबा, हत्ती खडक, नेढे आणि पूर्वेकडचा बुलंद बुरुज पाहून परत तिठ्याशी आलो. ढिब्यांकडचं पोरगं थोड्याच वेळात आलं. दुपारचा एक वाजून गेलेला. गायत्रीच्या कृपेने झालेल्या सकाळच्या अपुऱ्या नाष्ट्यामुळे आता पोटात कावकाव सुरु झालेली. सुदैवाने दुपारचं जेवण तिच्याकडे दिलं नव्हतं..!! तिथेच एका झाडाखाली बसून जेऊन घेतलं आणि निघालो. 

थंडीचे दिवस असले तरी सूर्य आता माथ्यावर येऊन आग ओकत होता. पण सह्याद्रीच्या कुशीत आणि राजगडाच्या पुण्यभूमीत आम्ही होतो. त्यामुळे उन्हाच्या तलखीचा विसर पडला होता. एकमेवाद्वितीय अशा दुहेरी तटबंदीचे, अजोड बुरुजांचे, आणि व्याघ्रमुखाचे दागिने लाभलेल्या संजीवनी माचीवर आलो. ती घडवण्यात राबलेल्या असंख्य कारागिरांच्या हातांना मनोमन वंदन केलं आणि अळू दरवाज्यातून बाहेर पडून राजगडाचा निरोप घेतला. संजीवनीच्या बुलंद तटबंदीच्या बाजूने समांतर जाऊन ही वाट माचीच्या पश्चिम बुरुजाच्या बुंध्याशी येते. तिथून पश्चिमेकडल्या सोंडेवरून उतरून कोल्हे खिंडीमार्गे तोरण्याकडे जाते. तर दक्षिणेकडील सोंडेवरून उतरून ढिबे मामांच्या धनगरवाड्यामार्गे पुढे भुतोंड्यास जाते. आम्ही भुतोंड्याची वाट धरली.

पाऊणएक तासाच्या चालीनंतर ढिबे मामांच्या झापाशी आलो. कुडाच्या भिंती, गवतकाड्यांनी शाकारलेलं छत, आत एक तान्हुलं लुगड्याच्या झोपाळ्यात निजलेलं, समोर गुरांचा गोठा, त्यात असलेल्या वासराच्या गळ्यातल्या घंटीचा किणकिण आवाज, आणि मागल्या बाजूस राजगडाचा बुलंद पहारा. मनास बघता क्षणी भुरळ पाडणारी जागा.. त्या झापाशी जरा टेकलो. घसा ओला केला. धनगराच्या घरचं अमृत म्हणजेच ताक...सगळ्यांनी मिळून ताकाचा हंडा घशाखाली रिता केला आणि भुतोंड्याच्या वाटेस लागलो. संजीवनीच्या खालतें दोनतीन टेप उतरून डांबरी रस्त्याला लागलो. कोल्हे खिंडीतून भुतोंड्याकडे येणारा हा रस्ता. तोच धरून साधारण पाचच्या सुमारास भुतोंड्यास पोचलो. 

गावात कुंभळ्याकडे जाण्यासाठी चौकशी केली. पण गावकर्यांचं म्हणणं पडलं की यापुढं निघून काळोखाच्या आत पोचणं कठीण होईल. त्यामुळं आज इथेच राहा आणि सकाळी लवकर निघा. गावकऱ्यांचा सल्ला मानून आम्ही गावातच राहण्याचा निर्णय घेतला. गावाबाहेरच्या शाळेच्या पडवीत डेरा टाकला. भानुराज अस्ताच्या मार्गावर गेले आणि इथे आमच्या चमूमधील मधील आचारी पाणिनी आणि प्रणव स्वयंपाकास भिडले. सूप आणि खिचडीचा बेत झाला. जेवल्यावर शाळेसमोरच्या अंगणात चांदणगप्पा रंगल्या. नीरव शांततेत स्लीपिंग बॅग मध्ये शिरून झोपलो.

पहाटे चारच्या सुमारास जाग आली. शाळेचं अंगण स्वच्छ चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेलं. पाणिनीला उठवलं आणि म्हटलं “चल, राशिदभाईंचा अहीरभैरव ऐकू.” त्यालाही कल्पना आवडली. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात, त्या पहाटेच्या वेळी, नीरव शांततेत राशिदभाईंची ‘अलबेला सजन आयो…’ ही अहीरभैरवातली बंदिश वातावरणात वेगळंच चैतन्य भरत होती. त्या समाधीतून आम्ही दोघे बाहेर आलो तेव्हा पाच वाजत आलेले. सगळ्यांना उठवलं. आवराआवर करून थोडं फार खाऊन सहाच्या ठोक्याला निघालो.

दहा हत्तीचं बळ असलेल्या रणमर्द येसाजी कंकांचं भुतोंडे गाव. त्यांचे वंशज अजूनही भुतोंड्यात आहेत ही माहिती होती. गावात त्यांचं घर शोधून काढलं आणि भुतोंडे सोडण्यापूर्वी एका अविस्मरणीय अनुभवाचे साक्षी झालो. येसाजींच्या घरात जे त्यांच्या वंशातले गृहस्थ होते, त्यांनी येसाजींची सात ठोक्यांची तलवार दाखवली. पूर्वी सरदाराची तलवार हे त्याच्या रणांगणातल्या पराक्रमाचं मोजमाप होतं. शंभर गनीम मारले की तलवारीच्या मुठीवर एक ठोका पडत असे. असे त्या तलवारीवर सात ठोके होते. त्यावरून येसाजींच्या पराक्रमाची कल्पना यावी.
जी तलवार आम्हाला हातात धरणं जड जात होतं, ती घेऊन लढणाऱ्या येसाजींची ताकद काय असावी, हे आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. येसाजींना आणि त्यांच्या त्या सौदामिनीप्रमाणे लखलखणाऱ्या तलवारीला सादर वंदन करून आम्ही कुंभळ्याच्या वाटेस लागलो.

गावाबाहेरची एक छोटी तर पार कडून पलीकडे गेलो. पलीकडचा डोंगर चढून, थोडी सपाटीची वाट तुडवून कुंभळे गावाच्या अलीकडे असलेल्या डोंगरमाथ्यावर आलो. इथून लांबवर गोप्या घाटाची माथ्यावरची खिंड दिसू लागली. आम्हाला तिथेच जायचं होतं. म्हटलं चला, गोप्या घाटाची खिंड दिसायला लागली, तिथून उतरलो की पोचलोच शिवथरी…!!! भराभर पावलं टाकत ती डोंगराची उतरण पार केली आणि कुंभळ्यात पावते झालो. पन्नाससाठ उंबऱ्यांचं गाव. तिथेच एका घराच्या ओसरीत स्टो मांडला आणि झकास उपमा केला. त्याच घरात एका बकरीनं अगदी अर्ध्या तासापूर्वी एका कोकराला जन्म दिला होता. त्याची नाळ देखील अजून पडली नव्हती.
त्या गोंडस कोकराला कुरुवाळलं आणि गोप्या खिंडीकडे निघालो.

वाटेत एका शेतात एक गावकरी औत घेऊन नांगरणी करत होता. पाणिनीला काय खाज आली कोण जाणे. त्याने त्या गाववाल्याला विनंती केली मी थोड्या वेळ औत धरू का? तो गावकरी पण महान..! त्याने हो म्हटलं आणि पाणिनीने औत धरला. दोन चार पावलं धड चालला असेल. त्या बैलांना बहुधा आपल्याला एका बैलानेच धरलंय याची जाणीव झाली असावी. ते क्षणार्धात उधळून वेडेवाकडे धावत सुटले आणि चक्क आमच्याकडे यायला लागले. पाणिनी मागे औत धरून बैलांमागे पळतोय, आम्ही बैलांपासून बचाव करायला जीव मुठीत धरून धावतोय, आणि तो गावकरी त्या बैलांना पकडण्याकरता त्यांच्यामागे पळतोय, असं मजेशीर दृश्य होतं ते.,..आज ते आठवलं की मजेशीर वाटतं, पण तेव्हा आमची सगळ्यांचीच पार तंतरलेली..!!

तासाभरात गोप्या घाटाच्या माथ्यावर खिंडीशी आलो. म्हटलं वा, आता थोड्याच वेळात घाट उतरला की शिवथरी पोचू…!! पण गोप्या घाटाच्या माथ्यवरून दिसलेल्या दृश्याने आपला अंदाज सपशेल चुकला आहे याची जाणीव झाली आणि घसा कोरडा पडला. दरीत लांबवर कुठेतरी शिवथर गावाची घरं बारीक टिम्ब दिसावीत तशी दिसत होती. ते पाहून ट्रेक लवकर संपवून घरी लवकर पोचू हे कल्पनेतलं चित्र पार विरून गेलं. पण आता परतीचे दोर कापलेले होते. मागल्या बाजूस राजगडाचा बालेकिल्ला कुठल्याकुठं दिसत होता. प्रणवने किती चालवतोयस म्हणून मला यथेच्छ शिव्यास्नान घातलं. जवळंच एक पाण्याचं छोटं कुंड होतं. त्यातलं नितळ थंडगार पाणी तोंडावर मारलं. अजून किती भयंकर उतरून जायचं आहे या जाणिवेच्या पार्श्वभूमीवर  त्या अमृततुल्य पाण्याने जरा दिलासा दिला. आम्ही उतरायला लागलो. दुपारच्या टळटळीत उन्हात या घाटातल्या वाटेवरचं गच्च जंगल सुखावह वाटत होतं.  

अडीच तासांच्या उतरणीनंतर गोप्या घाटाच्या पायथ्याच्या सपाटीवर आलो. आता लवकरच शिवथरघळीत पोचू या विचाराने झालेला आनंद, शिवथरघळ अजून पाच किलोमीटर लांब आहे या एका गावकऱ्याने दिलेल्या माहितीने मावळून गेला. तसंच स्वतःला रेटत रेटत एकदाचे शिवथरघळी पोचलो. 
सकाळी सहाला भुतोंड्यावरून सुरुवात केलेल्या पायपिटीची संध्याकाळची पाचला शिवथरघळी सांगता झाली. समर्थांच्या पायी पडलो आणि श्रम हलके झाले. आपल्या अचाट कर्तृत्वावर स्वराज्य स्थापना करणाऱ्या गडपती छत्रपतींच्या राजगड या पुण्यभूमीवरून सुरुवात केलेल्या खेची पण अनोख्या भटकंतीची, त्यांना अध्यात्मिक आणि मानसिक बळ देणाऱ्या त्यांच्याच गुरुवर्य समर्थ रामदासांच्या पुण्यभूमीत सुखरूप सांगता झाली होती. आम्हा लेकुरवाळ्यांच्या अनुभवांच्या, आनंदाच्या आणि अविस्मरणीय अनुभूतींच्या इवल्याशा शिदोरीत त्या सह्याद्रीनं पुन्हा एकदा भर घालून तो शिवथरच्या मागे अचल अवस्थेत उभा होता. त्याचे आणि समर्थांचे मनोमन आभार मानले आणि घराचा रस्ता धरला.

No comments:

Post a Comment