Tuesday, April 28, 2020

यमनचं भावविश्व

काही रागंच असे आहेत की ते कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी ऐकले तरी त्यातून मिळणारी आनंदानुभूती तसूभरंही कमी होत नाही. त्या रागांमधल्या पारंपरिक बंदिशींचं बुजुर्गांनी काढून ठेवलेलं आपल्या मनातलं स्वरचित्र कधीही फिकं पडत नाही. त्या रागांमधले छोटे-बडे ख्याल असोत, नाट्य-संगीतं असोत, भजन-अभंग असोत, भावगीतं असोत, किंवा चित्रपटगीतं असोत. त्यातून मिळणारा आनंद हा चिन्मय असतो. 


यमन हा असाच एक राग. सातंही  शुद्ध स्वरांना आणि तीव्र मध्यमाला आपल्या कवेत घेऊन विहरणारा. साधी प्रवृत्ती, कुठलीही नाटकं नाहीत. एखाद्या प्रेमळ बाळबोध आजीबाईंप्रमाणे त्यांना आपल्या पदरात घेऊन कुरुवाळत आपल्यावर मायेची पखरण करणारा. 


याचं स्वरूप किती साधं असावं? गाताना किंवा वाजवताना अमुक अमुक शुद्ध स्वर यात घायचा नाही, हे भान ठेवायची गरज नाही. कोमल स्वरांची यात मुळीच हजेरी नाही. त्यामुळे कुठला स्वर कोमल येतो, कुठला नाही, याचा डोक्याला आणि गळ्याला ताप नाही. तीनही सप्तकांत मुक्तपणे संचार. त्यामुळे पूर्वांग-उत्तरांगांच्या सीमांचं बंधन नाही. पण म्हणून यमन सोपा होतो का? पटकन शिकून होतो का? मुळीच नाही. 


भीमण्णा एकदा म्हणाले “यमन मला दूरवर असणाऱ्या क्षितिजाप्रमाणे दिसतो. आपण त्या क्षितिजापर्यंत जावं, तर दुसरं क्षितिज दिसायला लागतं...आणि मग कळतं की आपण अजून पोचलोच नाही. म्हणून असं वाटतं की यमनमध्ये अजून खूप शिकायचं बाकी आहे.” भीमण्णांसारख्या ऋषितुल्य स्वाराचार्यांनी यमनबद्दल काढलेल्या या उद्गारांनी या साध्या वाटणाऱ्या रागाची व्याप्ती ध्यानात यावी. अनेक सिद्धहस्त कलाकारांनी यमन मध्ये करून ठेवलेली स्वरकिमया थक्क करणारी आहे. राग तोच, स्वर तेच. पण प्रत्येकाचा स्वरलगाव, स्वरविचार, रागविस्तार, तीच बंदिश मांडण्याची पद्धत या सर्वातील विविधतेने यमन चं क्षितिज हे इतकं विस्तारलंय की त्याचा एक एक स्वर रंध्रांमध्ये भिनण्यासाठी एक एक जन्म अपुरा पडावा. 


भीमण्णांचा यमनमधला “काहे सखी कैसे के करिये, भरीये दिन ऐसो लालन के संग” हा विलंबित एकतालातला बडा ख्याल म्हणजे साक्षात स्वरामृताचा प्यालाच…!! त्यानंतरची, गोकुळातल्या रानराईत कृष्ण बासरी वाजवायला लागल्यावर ऐकणाऱ्यांची अवस्था प्रतिबिंबित करणारी “श्याम बजाये आज मुरलीया” ही मध्यलय त्रितालातली बंदिश साक्षात बासरी वाजवणाऱ्या त्या घनश्यामाला यमनच्या सुरावटींतून आपल्यासमोर उभी करते... आणि त्यावरचा कळस असणारा “तानित दिम तान देरेना” हा द्रुत एकतालातला तराणा म्हणजे अलौकिक स्वरन्यास..!! भीमण्णांनी यात पेश केलेल्या अचाट गायकीतून यमन शिकायला एक आयुष्य पुरणार नाही याची खात्री पटते....आणि तरीसुद्धा हा स्वरपितामह जेव्हा “यमनमध्ये अजून खूप शिकायचं बाकी आहे” असं म्हणतो, तेव्हा आपण त्या रागिणीपुढे फक्त नतमस्तक व्हायचं.


यमन मधून किती भाव व्यक्त व्हावेत? आनंद, विरह, प्रेम, दुःख, भक्ती, विरक्ती..किती सांगावेत. निषाद, षड्ज ऋषभ आणि गंधार यांना धरून केलेली आळवणी वातावरणात आनंद भरते, तर पंचमावरून तीव्र मध्यमाला स्पर्शून गंधरावरती झालेली उतरण विरहाची सल देते. निषादाच्या जोडीने ऋषभावरून षड्जावर आलेला ठेहराव मनात भक्तीभाव निर्मितो, तर त्याच षड्जावरून खाली निषादाला धरून धैवतापर्यंत आलेली स्वरावली मनात विरक्ती आणते. कधी या स्वरावली एखादी प्रेयसी तिच्या प्रियकराची डोळे लावून पाहत असलेली वाट दाखवतात, ये रे, ये रे अशी घातलेली आर्त साद ऐकवतात, तर कधी गंधार-तीव्र मध्यम, किंवा निषाद-धैवत गोंजारत पंचमावर स्थिरावलेलं चैतन्य, तो भेटल्यावरचा तिला झालेला आनंद दाखवतात.


यमन मधल्या एक एक बंदिशी म्हणजे काय सांगाव्या. नदीवर कान्ह्याचं गवळणींना दर्शन होतंय, आणि त्याला पाहून त्यांच्या मनात आनंदाचं जणू भरतं येतंय, आणि त्या कान्ह्याला माझी घागर भरून दे रे, अशी गोड विनवणी त्या करत आहेत, हे सांगणारी हिराबाईंच्या गोड आवाजातली “मोरी गगरवा भरन दे” ही बंदिश म्हणजे निरागस प्रेमभावाचा परमोच्च बिंदूच ठरावा. “जिया मानत नाही” किंवा “मो मन लगन लागी” ह्या पारंपरिक बडा ख्यालातल्या बंदिशी प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभावाचं एक अनोखं दर्शन घडवतात. “न नदिके वचनुवा सहे न जा” ही त्रितालातल्या चौथ्या मात्रेवरून उठावणारी सुंदर बंदिश, किंवा “पिया की नजरिया जादूभरी” ही नवव्या  मात्रेवरून सुरुवात होणारी  चीज, यमनचं प्रेमभावविश्व अलगद उलगडतात. वीणाताईंचे “दिम तन देरेना देरेना देरेना ता दिम तन”, “दे रे ता नुं तदरे ता नि, उदन त दारे” हे तराणे म्हणजे दिगंतापर्यंत यमनची ओळख करून देणारे मापदंडच ठरावेत. तसंच बालगंधर्वांचं सर्वश्रुत “नाथ हा माझा” हे यमन मधलं पद म्हणजे भरजरी पैठणीच..!!. तिचे काठपदर यमनचे जे भाव दाखवतात त्यांनी निव्वळ संमोहित होण्या पलीकडे काही होत नाही. हेच प्रेमभाव, आनंदभाव “जिन्दगी भर नही भुलेगी वो बरसात कि रात”, “घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही”, “एहेसान तेरा होगा मुझपर” या यमनबद्ध चित्रपटगीतांमधूनही दिसतो. 


असा हा आनंदाची बरसात करणारा यमन दुःख किंवा विरहाची भावना कशी काय दाखवत असावा, असा प्रश्न पडतो. पण मग कळतं, तेच स्वर, तेच चलन, तीच पकड इतका विरोधाभास दाखवतात हीच तर श्रुतीस्वरांची जादू आहे. वानगीदाखल बोलायचं झालं तर, “तोच चंद्रमा नभात” हे जणू आयुष्याच्या संध्याकाळी म्हटलेलं भावगीत. त्यातील यमनच्या सुरावटी आपली प्रिय व्यक्ती जवळ असल्यामुळे होणारा आनंदही दाखवतात, तर त्याच प्रीतीत काहीतरी उणीव असल्याची टोचणी देखील समोर आणतात. जिवलगा कधी रे येशील तू हे यमन मधलं (ध्रुवपद) भावगीत तर विरहाकुल प्रेयसीनं प्रियकराला घातलेली आर्त सादंच…!! त्याचप्रमाणे “रंजीश ही सही” ही गझल येऊन परत गेलेल्या प्रियंकाराबद्दलचा विरहभाव यमनच्या स्वारलालित्यातून तंतोतंत उद्धृत करते.


यमन मधनं प्रकट होणारा भक्तिभाव, शरणभाव हा देखील ह्रिदयाला सहज भिडतो. मग ते भीमण्णा आणि वसंतरावांनी गायलेलं “टाळ बोले चिपळीला असेल”, किंवा भीमण्णांनी “नामाचा गजर गर्जे भीमातीर” मधून विठ्ठलाला मारलेली हाक असेल. “राधाधर मधु मिलिंद जय जय” हे गोपाळकृष्णाचं भजन असलेलं सौभद्रातील नाट्यपद असेल किंवा नुसतंच “जय जय राम कृष्ण हरी” या ओळींनीं केलेली भगवंताची आळवणी असेल. “श्रीरामचंद्र कृपालु भज मन” हे रामरायाचं  तुलसीदासांनी लिहलेलं स्तवन असेल, किंवा यमन मध्ये गायलं तर फार गोड वाटणारं साधं “घालीन लोटांगण असेल.”  यमन तोच. पण किमया अनंत. प्रत्येक रचनेतल्या सुरावटींनी ह्रिदय अगदी भक्तिभावानं भरून जातं.

पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात एखाद्या शांत सुंदर तलावाकाठी यावं, तलावाकाठच्या दगडाला पाठ टेकून थंड पाण्यात पाय सोडावेत,  समोर पाण्यात पडलेली तारकांची असंख्य प्रतिबिंब न्याहाळावीत, मंद-थंड वाऱ्याच्या झुळुकांवर हलणाऱ्या पाण्याच्या नाजूक तरंगांवर हिंदोळणारं चंद्रबिंब डोळ्यात साठवावं, बाजूला तंबोऱ्याचे पवित्र स्वर छेडले जावेत, आणि यमन च्या सुरावटींनी स्वतःला चिंब चिंब भिजवून घ्यावं. सुखानंद म्हणतात तो याहून वेगळा तरी कसा असेल?

No comments:

Post a Comment