Tuesday, April 28, 2020

यमनचं भावविश्व

काही रागंच असे आहेत की ते कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी ऐकले तरी त्यातून मिळणारी आनंदानुभूती तसूभरंही कमी होत नाही. त्या रागांमधल्या पारंपरिक बंदिशींचं बुजुर्गांनी काढून ठेवलेलं आपल्या मनातलं स्वरचित्र कधीही फिकं पडत नाही. त्या रागांमधले छोटे-बडे ख्याल असोत, नाट्य-संगीतं असोत, भजन-अभंग असोत, भावगीतं असोत, किंवा चित्रपटगीतं असोत. त्यातून मिळणारा आनंद हा चिन्मय असतो. 


यमन हा असाच एक राग. सातंही  शुद्ध स्वरांना आणि तीव्र मध्यमाला आपल्या कवेत घेऊन विहरणारा. साधी प्रवृत्ती, कुठलीही नाटकं नाहीत. एखाद्या प्रेमळ बाळबोध आजीबाईंप्रमाणे त्यांना आपल्या पदरात घेऊन कुरुवाळत आपल्यावर मायेची पखरण करणारा. 


याचं स्वरूप किती साधं असावं? गाताना किंवा वाजवताना अमुक अमुक शुद्ध स्वर यात घायचा नाही, हे भान ठेवायची गरज नाही. कोमल स्वरांची यात मुळीच हजेरी नाही. त्यामुळे कुठला स्वर कोमल येतो, कुठला नाही, याचा डोक्याला आणि गळ्याला ताप नाही. तीनही सप्तकांत मुक्तपणे संचार. त्यामुळे पूर्वांग-उत्तरांगांच्या सीमांचं बंधन नाही. पण म्हणून यमन सोपा होतो का? पटकन शिकून होतो का? मुळीच नाही. 


भीमण्णा एकदा म्हणाले “यमन मला दूरवर असणाऱ्या क्षितिजाप्रमाणे दिसतो. आपण त्या क्षितिजापर्यंत जावं, तर दुसरं क्षितिज दिसायला लागतं...आणि मग कळतं की आपण अजून पोचलोच नाही. म्हणून असं वाटतं की यमनमध्ये अजून खूप शिकायचं बाकी आहे.” भीमण्णांसारख्या ऋषितुल्य स्वाराचार्यांनी यमनबद्दल काढलेल्या या उद्गारांनी या साध्या वाटणाऱ्या रागाची व्याप्ती ध्यानात यावी. अनेक सिद्धहस्त कलाकारांनी यमन मध्ये करून ठेवलेली स्वरकिमया थक्क करणारी आहे. राग तोच, स्वर तेच. पण प्रत्येकाचा स्वरलगाव, स्वरविचार, रागविस्तार, तीच बंदिश मांडण्याची पद्धत या सर्वातील विविधतेने यमन चं क्षितिज हे इतकं विस्तारलंय की त्याचा एक एक स्वर रंध्रांमध्ये भिनण्यासाठी एक एक जन्म अपुरा पडावा. 


भीमण्णांचा यमनमधला “काहे सखी कैसे के करिये, भरीये दिन ऐसो लालन के संग” हा विलंबित एकतालातला बडा ख्याल म्हणजे साक्षात स्वरामृताचा प्यालाच…!! त्यानंतरची, गोकुळातल्या रानराईत कृष्ण बासरी वाजवायला लागल्यावर ऐकणाऱ्यांची अवस्था प्रतिबिंबित करणारी “श्याम बजाये आज मुरलीया” ही मध्यलय त्रितालातली बंदिश साक्षात बासरी वाजवणाऱ्या त्या घनश्यामाला यमनच्या सुरावटींतून आपल्यासमोर उभी करते... आणि त्यावरचा कळस असणारा “तानित दिम तान देरेना” हा द्रुत एकतालातला तराणा म्हणजे अलौकिक स्वरन्यास..!! भीमण्णांनी यात पेश केलेल्या अचाट गायकीतून यमन शिकायला एक आयुष्य पुरणार नाही याची खात्री पटते....आणि तरीसुद्धा हा स्वरपितामह जेव्हा “यमनमध्ये अजून खूप शिकायचं बाकी आहे” असं म्हणतो, तेव्हा आपण त्या रागिणीपुढे फक्त नतमस्तक व्हायचं.


यमन मधून किती भाव व्यक्त व्हावेत? आनंद, विरह, प्रेम, दुःख, भक्ती, विरक्ती..किती सांगावेत. निषाद, षड्ज ऋषभ आणि गंधार यांना धरून केलेली आळवणी वातावरणात आनंद भरते, तर पंचमावरून तीव्र मध्यमाला स्पर्शून गंधरावरती झालेली उतरण विरहाची सल देते. निषादाच्या जोडीने ऋषभावरून षड्जावर आलेला ठेहराव मनात भक्तीभाव निर्मितो, तर त्याच षड्जावरून खाली निषादाला धरून धैवतापर्यंत आलेली स्वरावली मनात विरक्ती आणते. कधी या स्वरावली एखादी प्रेयसी तिच्या प्रियकराची डोळे लावून पाहत असलेली वाट दाखवतात, ये रे, ये रे अशी घातलेली आर्त साद ऐकवतात, तर कधी गंधार-तीव्र मध्यम, किंवा निषाद-धैवत गोंजारत पंचमावर स्थिरावलेलं चैतन्य, तो भेटल्यावरचा तिला झालेला आनंद दाखवतात.


यमन मधल्या एक एक बंदिशी म्हणजे काय सांगाव्या. नदीवर कान्ह्याचं गवळणींना दर्शन होतंय, आणि त्याला पाहून त्यांच्या मनात आनंदाचं जणू भरतं येतंय, आणि त्या कान्ह्याला माझी घागर भरून दे रे, अशी गोड विनवणी त्या करत आहेत, हे सांगणारी हिराबाईंच्या गोड आवाजातली “मोरी गगरवा भरन दे” ही बंदिश म्हणजे निरागस प्रेमभावाचा परमोच्च बिंदूच ठरावा. “जिया मानत नाही” किंवा “मो मन लगन लागी” ह्या पारंपरिक बडा ख्यालातल्या बंदिशी प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभावाचं एक अनोखं दर्शन घडवतात. “न नदिके वचनुवा सहे न जा” ही त्रितालातल्या चौथ्या मात्रेवरून उठावणारी सुंदर बंदिश, किंवा “पिया की नजरिया जादूभरी” ही नवव्या  मात्रेवरून सुरुवात होणारी  चीज, यमनचं प्रेमभावविश्व अलगद उलगडतात. वीणाताईंचे “दिम तन देरेना देरेना देरेना ता दिम तन”, “दे रे ता नुं तदरे ता नि, उदन त दारे” हे तराणे म्हणजे दिगंतापर्यंत यमनची ओळख करून देणारे मापदंडच ठरावेत. तसंच बालगंधर्वांचं सर्वश्रुत “नाथ हा माझा” हे यमन मधलं पद म्हणजे भरजरी पैठणीच..!!. तिचे काठपदर यमनचे जे भाव दाखवतात त्यांनी निव्वळ संमोहित होण्या पलीकडे काही होत नाही. हेच प्रेमभाव, आनंदभाव “जिन्दगी भर नही भुलेगी वो बरसात कि रात”, “घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही”, “एहेसान तेरा होगा मुझपर” या यमनबद्ध चित्रपटगीतांमधूनही दिसतो. 


असा हा आनंदाची बरसात करणारा यमन दुःख किंवा विरहाची भावना कशी काय दाखवत असावा, असा प्रश्न पडतो. पण मग कळतं, तेच स्वर, तेच चलन, तीच पकड इतका विरोधाभास दाखवतात हीच तर श्रुतीस्वरांची जादू आहे. वानगीदाखल बोलायचं झालं तर, “तोच चंद्रमा नभात” हे जणू आयुष्याच्या संध्याकाळी म्हटलेलं भावगीत. त्यातील यमनच्या सुरावटी आपली प्रिय व्यक्ती जवळ असल्यामुळे होणारा आनंदही दाखवतात, तर त्याच प्रीतीत काहीतरी उणीव असल्याची टोचणी देखील समोर आणतात. जिवलगा कधी रे येशील तू हे यमन मधलं (ध्रुवपद) भावगीत तर विरहाकुल प्रेयसीनं प्रियकराला घातलेली आर्त सादंच…!! त्याचप्रमाणे “रंजीश ही सही” ही गझल येऊन परत गेलेल्या प्रियंकाराबद्दलचा विरहभाव यमनच्या स्वारलालित्यातून तंतोतंत उद्धृत करते.


यमन मधनं प्रकट होणारा भक्तिभाव, शरणभाव हा देखील ह्रिदयाला सहज भिडतो. मग ते भीमण्णा आणि वसंतरावांनी गायलेलं “टाळ बोले चिपळीला असेल”, किंवा भीमण्णांनी “नामाचा गजर गर्जे भीमातीर” मधून विठ्ठलाला मारलेली हाक असेल. “राधाधर मधु मिलिंद जय जय” हे गोपाळकृष्णाचं भजन असलेलं सौभद्रातील नाट्यपद असेल किंवा नुसतंच “जय जय राम कृष्ण हरी” या ओळींनीं केलेली भगवंताची आळवणी असेल. “श्रीरामचंद्र कृपालु भज मन” हे रामरायाचं  तुलसीदासांनी लिहलेलं स्तवन असेल, किंवा यमन मध्ये गायलं तर फार गोड वाटणारं साधं “घालीन लोटांगण असेल.”  यमन तोच. पण किमया अनंत. प्रत्येक रचनेतल्या सुरावटींनी ह्रिदय अगदी भक्तिभावानं भरून जातं.

पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात एखाद्या शांत सुंदर तलावाकाठी यावं, तलावाकाठच्या दगडाला पाठ टेकून थंड पाण्यात पाय सोडावेत,  समोर पाण्यात पडलेली तारकांची असंख्य प्रतिबिंब न्याहाळावीत, मंद-थंड वाऱ्याच्या झुळुकांवर हलणाऱ्या पाण्याच्या नाजूक तरंगांवर हिंदोळणारं चंद्रबिंब डोळ्यात साठवावं, बाजूला तंबोऱ्याचे पवित्र स्वर छेडले जावेत, आणि यमन च्या सुरावटींनी स्वतःला चिंब चिंब भिजवून घ्यावं. सुखानंद म्हणतात तो याहून वेगळा तरी कसा असेल?

Thursday, April 23, 2020

थ्री इडियट्स आणि बॅकवॉटर्स वरील वैऱ्याची रात्र

थ्री इडियट्स आणि बॅकवॉटर्स वरील वैऱ्याची रात्र
-- सौरभ जोशी 


भुत्याचं त्यावेळी सुटलेलं पोट आत घेण्यासाठी हातभार म्हणून डोंगरात भटकंतीला जायचा बेत आखला. भल्या पहाटे मी, भुत्या (प्रणव) आणि महेश (कालिया) भुत्याच्या गाडीनं बोरिवलीहून निघालो. पाऊस आषाढ आणि श्रावणाच्या उंबरठ्यावर असला तरी त्याचा जोर चांगलाच होता. निघालो आणि अर्ध्या तासातंच माशी शिंकली. 


घोडबंदर रोडवर हा थोरला ट्राफिक. अर्धा-पाऊण तास गाडी जागच्या जागी ठप्प..!! म्हटलं काय पनवती लागलीय राव..!! गाडीत लावलेला भैरवाचा खर्ज षड्ज, आणि भुत्याच्या ट्रॅफिकवरील शिव्यांचा ‘भिन्न’ षड्ज एकाच वेळी घुमू लागले..!!..आणि भुत्याच्या अंगात जणू भूतंच संचारलं. त्याने सरळ एक कट मारला आणि विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गाडी घातली आणि रपारप नेली. निदान त्यामुळे ट्रॅफिकची तरी पिडा टळली.


शहापूर ओलांडलं. डावीकडे धुक्याच्या दुलईत लपलेली माहुली दिसायला लागली आणि ट्रेक ला निघाल्याचा फील आला. श्री दत्त स्नॅक्स मध्ये वडा पाव आणि पोहे हाणले, आणि सुटलो. वातावरण मस्त कुंद होतं. आसमंतात पसरलेली ढगांची चादर सूर्यकिरणं जमिनीवर पडू देत नव्हती. पाऊस आणि वारा आळीपाळीनं वातावरणात मृदगंधाची शिंपण करीत होते. कसारा घाटातला डावीकडचा जव्हार फाटा ओलांडला आणि घाटाच्या बाजूनी खाली उतरणाऱ्या ढगांनी पार लपेटून टाकलं. मधेच डावीकडून घाटातनं धडधडत जाणारी ट्रेन घाटातल्या रेल्वे लाईनची जाणीव करून देत होती. हेड लाईटच्या प्रकाशात धुकं कापत कापत इगतपुरीस पोचलो. एरवी इगतपुरी गाठली की अगदी प्रतिक्षिप्त क्रियेसारखी नजर अलंग-मदन-कुलंग या दुर्गरत्नांकडे खिळली जाते. तशी ती खिळलीच. पण पावसाळ्यामुळे आज त्या दुर्गाराजांचं दर्शन धुक्यानं आमच्यापासून हिरावलं होतं. पण तरी काय झालं? त्यांचं अस्तित्व हृदयात तर आहेच की..!!! त्यांना मनोमन साद घालून घोटी ओलांडली.


बारीत गोरख खराडेच्या अंगणात गाडी लावली आणि तडक निघालो. शेताच्या बांधांवरुन उसळ्या मारून जाणाऱ्या पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण सुरु झाले. कळसुबाई धुक्याचा पदर डोक्यावर घेऊन बसली होती. तिच्या अजस्र पहाडावरून स्वतःला झोकून देणाऱ्या धबधब्यांची पंगत धुक्यातून मधूनंच मोहक दर्शन देत होती. सोसाट्याचा घोंगावणारा वारा, ओढ्यांचा खळखळाट, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि पावसाचं गाणं असा निसर्गदेवतेनं वाद्यवृंद मांडलेला. त्याला दाद देत नखशिखांत ओले होत कळसुबाई शिखरावर पोचलो तेव्हा साधारण दुपारचा एक वाजला असेल. चहू बाजूस नुसतं धुकं, धुकं आणि धुकंच..!!! ...
आणि भराट वारा इतका की एकट्यानं आधाराविना सुटं उभं राहणं देखील मुश्किल होत होतं. त्यात अंगावर संपूर्ण भिजलेले कपडे अंगात थंडी भरत होते. कळसू देवीचं दर्शन घेऊन परतीस लागलो. बेभान वारा अंगावर घेत धुक्यात हरवलेल्या शिडीच्या पायऱ्या अंदाजानं उतरत शिखराजवळच असलेल्या विहिरीजवळच्या झापात आलो. तिथे गावकऱ्यानं पेटवलेल्या चुलीच्या धगीवर ओलंचिंब झालेलं अंग शेकून घेतलं. अंगात उब आली
आणि दातांची तडतड बंद झाली. जेऊन घेतलं आणि तसंच परत पाऊस अंगावर घेत उतरणीस लागलो. बारीत पावेतो साडेचार वाजलेले. भराभर चहा मारून आमच्या पुढील गंतव्य स्थानाकडे म्हणजेच साम्रदकडे निघालो. 


भंडारदरा बॅकवॉटर्सचा एक भला मोठा हात साम्रदला येतो. साम्रद हे घाटमाथ्यावरचं एक मस्त गाव. एकीकडे रतनगड, त्याचा खुट्टा, आजोबा, कात्राबाई, शिपनुर यासारखे महाकाय डोंगर, तर दुसरीकडे करोली घाट, देवी घाट, चोंढे घाट, साकुर्ली घाट अशा अनगड घाटवाटा. एकीकडे विस्तीर्ण पसरलेलं पठार, तर दुसरीकडे भंडारदऱ्याचं हातपाय ताणून पसरलेलं प्रचंड बॅकवॉटर्स. त्यातलाच एक भला थोरला हात साम्रदी येऊन मिळतो. त्याच्या काठावर तंबू ठोकून कॅम्पिंग करण्याचा आमचा बेत होता.


पावसाळ्यामुळे बारी साम्रद या रस्त्याची पार वाट लागलेली. पावसाची
ये-जा अविरत चालूच होती. बॅकवॉटर्सच्या कडेकडेने जाणारा, डोंगरांना विळखे घालणारा, आणि असंख्य धबधब्यांनी नटलेला तो रस्ता पार करून साम्रदला पोचेस्तोवर जवळजवळ साडेसहा वाजले. साम्रदला पोचतानाच बॅकवॉटर्सच्या कुठल्या हाताच्या काठावर टेन्ट पीच करायचा हे गाडीतूनच ठरवून घेतलं. कारण वेळ हातातून निसटून जात होता. काळोख पडायच्या आत आणि पाऊस यायच्या आत टेन्ट पीच करायचा होता. साम्रदच्या हापशीजवळ गाडी लावली. त्वरित टेन्ट काढून पिचिंग च्या जागी जायला अक्षरशः पळत सुटलो. पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन टेन्ट पीच करायला सुरुवात केली. सुदैवानं पावसानं थोड्यावेळ मेहेरबानी केली. पण वाऱ्याचा जोर भयानक होता. त्यामुळे
टेन्टच्या भिंती स्थिर राहून उभ्या राहायला मागत नव्हत्या. निसर्ग घेत असलेल्या आमच्या परीक्षेस रीतसर सुरुवात झालेली. पेग्स मारून, मोठ्या मुश्कीलीने त्यात टेन्टच्या दोऱ्या ताणून बसवून कसाबसा टेन्ट पीच केला. तरी भणाणत्या वाऱ्यात हा टेन्ट टिकाव धरील का, ही धागधुग होतीच. एक जास्तीचा आधार म्हणून माझी मोठी छत्री अर्धी जमिनीत ठोकली आणि तिच्या जमिनीवरील अंगाला आऊटरची मेन दोरी आणि टेन्टच्या दोन दोऱ्या बांधून ठेवल्या. 


सूर्य अस्तास जाऊन काळोखायला लागलं. मधूनच एखादं चुकार पाखरू वेगवान वाऱ्यात आपल्या पंखांना सावरत कसंबसं आपल्या घरट्याकडे जाताना दिसत होतं. वातावरणात निर्मनुष्य शांतता आणि पाऊस-वाऱ्याचा गोंगाट असं एक अजब रसायन तयार झालं. लगेच जाऊन गाडीतनं सॅक्स आणल्या. टेन्टच्या आऊटर खाली त्या ठेवल्या आणि भराभर कपडे बदलून घेतले. जेमतेम सात-सव्वासात वाजले असतील आणि पावसाने परत दमदार हजेरी लावली. आम्ही पटकन रात्रीच्या जेवणाचं सामान आणि स्टोव्ह सॅक मधून काढून टेन्ट मध्ये घुसलो.


पाऊसाने संपूर्ण आसमंताला आता झोडपून काढायला सुरुवात केली. आजूबाजूचा कीर्र अंधार धुक्यामुळे अधिकच भयावह वाटत होता. पाण्यात उभी असलेली झाडं टेन्टच्या खिडकीतून धुक्यामुळे भुतासारखी दिसत होती. पण आता मागे फिरणं किंवा गावात जाऊन राहाणं देखील शक्य नव्हतं. भुकेने आता पोटात डोकं वर काढायला सुरुवात केली. पोर्टेबल स्टोव्ह टेंटमध्ये पेटवला आणि खिचडी शिजत ठेवली. पण टेन्टच्या आत हे उपदव्याप करत असल्याने स्टोव्हमध्ये केरोसीन न वापरता सुरक्षिततेच्या दृष्टीने फ्लेमच्या गोळ्या ठेवल्या, जेणेकरून फ्लेम छोटीच राहील. पण त्यामुळे खिचडी शिजायला बराच वेळ लागत होता. करणार काय? आमच्यात खाज अशा अडनिड्या ठिकाणी भर पावसात कॅम्पिंग करण्याची...मग हे सगळं ओघानं आलंच…!! तासाभराने खिचडी तयार झाली. खिचडी आणि स्वीट डिश म्हणून बरोबर आणलेले बेसनाचे लाडू असा झकास मेनू जमला. त्यावर ताव मारला आणि गप्पा मारत बसलो. 


झोपाळलेलं शरीर स्लीपिंग बॅगमध्ये कोंबलं आणि पाठ टेकली. मागल्या अहुपे कॅंपिंगच्या अनुभवावरून यावेळी टेन्टच्या सगळ्या शिवणींना मेण लावून आणलं होतं. त्यामुळे पाणी आत येणार नाही अशी आमची निरागस समजूत होती. त्या भरोशावर डोळे मिटले. पण ती समजूत सपशेल फोल ठरलीय, हे काही वेळातच कळलं. बाहेर वारा आणि पाऊस दोघेही भयानक पिसाटलेले होते. आऊटर आणि टेन्टची भिंत यामधून वारा आणि पाऊस टेन्टवर आदळत होते. पाऊस टेन्टच्या चेन, बंद खिडक्या, जमिनीपर्यंत खेचून घेतलेलं आऊटर या सगळ्या गोष्टींना न जुमानता टेन्ट मध्ये घुसत होता आणि स्लीपिंग बॅग भिजवत होता. टेन्टच्या कापडाची आणि आऊटरची मधमाशीच्या पंखांप्रमाणे अविरत फडफड चालू होती. मधेच अंगात आल्याप्रमाणे वाऱ्याचा जोर वाढी, आणि त्याबरोबर आलेला पाऊस टेन्टवर ताशे वाजवी. बऱ्याच वेळा बाहेरून बुडबुड बुडबुड असा पाण्याचा आवाज येई. जरी पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवून आम्ही टेन्ट लावला होता, तरी या आवाजानं धडकी भरायची. कारण पावसाचा जोर इतका होता, की  वाटायचं, पाणी फुगून टेन्ट पर्यंत आलं की काय? टेन्टसकट आम्ही पाण्यात तरंगायला लागलो की काय? त्यामुळे दर अर्ध्या तासाने आम्ही टेन्टची खिडकी उघडून बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. बाकीच्या वेळेत टेंटमध्ये गपचूप बसून राहण्याखेरीज काही उपाय नव्हता. इतक्या भयाण परिस्थितीत देखील कालियाच्या कालियाच्या श्वासांना खर्ज सापडला होता. 


रात्री दीड-दोन चा सुमार असेल. पावसाचा थयथयाट आणि भणाणत्या वाऱ्याचा गोंगाट चालूच होता. एवढ्यात भुत्याचा आवाज कानावर आला, “सौ, माझं अंग बघ रे, तापासारखं वाटतंय…”.  बघितलं तर भुत्याच्या अंगात एकच्या वर ताप… भुत्या फणफणला होता, कुडकुडत होता.. म्हटलं आता काय करायचं? अंगावर काही घालायला काही कोरडं नव्हतं. स्लीपिंग बॅग ओली झालेली. निसर्गाने आमची चांगलीच परीक्षा घेण्याचं ठरवलेलं होतं. रात्र वैऱ्याची आहे हे आता समजून चुकलं, पण धीर सोडून चालणार नव्हतं. कसबसं टेन्ट ची चेन उघडून माझ्या सॅक मधला मेडिकल किट, टेन्टमध्ये बसूनंच काढण्याचं दिव्य पार पाडलं. उरलेल्या फ्लेमच्या गोळीवर स्टोव्ह पेटवून थोडं पाणी गरम केलं आणि त्या गरम पाण्याबरोबर भुत्याला क्रोसिन दिली. छातीवर व्हिक्स चोपडलं, आणि झोपवून ठेवलं. भुत्या रशियातून डॉक्टरी करून नुकताच परतलेला होता, तरी मी डॉक्टर आणि तो पेशंट होता..!! अधून मधून त्याला गरम पाणी देणं चालू ठेवलं. त्यामुळे भुत्याच्या अंगात जरा उब आली आणि तापही थोडा कमी झाला. काही वेळानं भुत्याचं “xxxxxx सौ, कुठे कुठे आणतोस....” असं वाक्य कानावर पडलं, आणि त्यातल्या सुरुवातीच्या xxxxxx या शिवीवरून भुत्याच्या तब्येतीत सुधार पडलाय, अशी खात्री झाली…!!!


पाखरांची टिवटिव ऐकू यायला लागली, तेव्हा जीवात जीव आला,
कारण ते उजाडू लागल्याचं लक्षण होतं. टेन्टची चेन उघडून जरा बाहेर डोकावून बघितलं. बऱ्यापैकी फटफटलं होतं. पावसाचा जोर आता कमी झालेला, वारा बेफाट होता. बाहेर आलो. रात्रभराच्या पावसानं झोडपून काढलेला आसमंत बघितला. हिरवागार माळ, त्यावरले डवरलेले भलेथोरले रुख, लांबवर दिसत असलेली साम्रदची घरटी, टेन्टच्या मागल्या अंगास पसरलेलं पाणी, आणि तोंडावर हलक्याशा पावसानं उडत असलेले नाजूक शिंतोडे...वातावरणात आता एक विलक्षण चैतन्य जाणवत होतं. रात्रभर तांडव मांडलेल्या रौद्र निसर्गानं आता भलतंच सोजवळ रूपटं धरलेलं. सहज लक्ष टेन्ट आणि आऊटरच्या दोऱ्या बांधलेल्या माझ्या छत्रीकडे गेलं. तिचं जमिनीवरचं अंग काटकोनात वाकलेलं दिसलं तेव्हा त्या छत्रीनं रात्रभर प्राण पणाला लावून आमच्या टेन्टला धरून ठेवण्यात अखेर स्वतःची कुर्बानी दिली आहे, हे लक्षात आलं..!! कालिया आणि भुत्याला हा प्रकार दाखवला आणि तिघांनी मिळून तिला श्रद्धांजली वाहिली.


रात्रीची भांडी पाण्यावर घासून टेन्ट वाइंड अप केला, सॅक्स भरल्या आणि साम्रद गावात आलो. रामदास बांडे च्या पडवीत आलो. पूर्वी खुट्याच्या खिंडीतून तीन-चार वेळा रतनगडी जाताना डेरा रामदासकडेच टाकला असल्याने तो चांगलाच ओळखीचा. त्याच्याकडे बकरीच्या दुधाचा, साखरेऐवजी गूळ घातलेला चहा घेतला. त्याला कालपासूनचा आमचा कार्यक्रम सांगितला, कसे राहिलो ते सांगितलं. ते ऐकून त्याने कपाळाला हात मारला. 


इतकं सगळं होऊन देखील आमच्यातली खाज अजून कमी होत नव्हती. रामदासला म्हटलं सांदणच्या अलिकडल्या पठारावर घेऊन चल आणि उलटा धबधबा दाखव. तो ही तयार झाला. अर्धा-पाऊण तास धुक्यातली हिरव्यागार माळावरची वाट तुडवत करोली घाटाच्या माथ्यावरल्या पठारावर आलो. डावीकडे सांदण दरी, पलीकडे लपलेला रतनगड, समोर करोली घाटातनं संथपणे वर चढणारे कृष्णमेघ,
आजूबाजूला अवखळ ओढ्यांचा खळखळाट, धुक्याच्या दुलईतून मधूनच दर्शन देणाऱ्या सह्याद्रीच्या अजस्र भिंती, त्यावरून दरीत झेपावणारे असंख्य प्रपात, ऊर बडवून काढणारा बेभान वारा, आणि अंग नखशिखांत भिजवणारे पावसाचे टप्पोरे थेंब....सारंच संमोहित करणारं…!! जणूकाही रात्रभर जो त्रास सहन करावा लागला, त्यावर निसर्गानं आता अद्वितीय चैतन्याची फुंकर घातली होती. 


इथेच उजवीकडे एक मोठा ओढा धबधब्याचं रूप घेऊन दरीत पडतो, आणि खालून वर येणाऱ्या भन्नाट वाऱ्यामुळे पूर्ण खाली न पडता मधेच चक्क यू मारून परत माथ्यावर येतो. हाच तो उलटा धबधबा. निसर्गाची एक अचाट किमया आहे ती. सह्याद्रीचं ते एकमेवाद्वितीय रूप डोळे भरून न्याहाळलं आणि परतीची वाट धरली. 

सह्याद्री मोठा अजब आहे. कधी त्याचं निरागस लोभसवाणं रूप दाखवूंन देहभान विसरायला लावेल, तर कधी त्याचा रौद्रावतार दाखवून उरात धडकी भरवेल...कधी उन्हातान्हातून फिरवून शरीर रापवून काढेल, तर कधी त्याच रापलेल्या शरीरावरून थंडगार वाऱ्याने फुंकर मारील....कधी पाण्याविना कोसकोस चालवेल, तर कधी बेधुंद पावसाच्या तुषारांची अंगावर पखरण करील....कधी काट्याकुट्यातून चालताना ओरबाडेल, तर कधी गर्द रानराईतून अल्लड मुलीप्रमाणे बागडणाऱ्या मळवाटांवरून अलगद चालवेल....कधी तापलेल्या कभिन्न कातळाचे चटके देईल, तर कधी मखमली माळावर झोपवून अंगावर शुभ्र चांदण्याची शिंपण करेल.
आपण आपली शरीराची कुडी घेऊन फक्त त्याच्याकडे जायचं, तो दाखवेल त्या नजाऱ्यानं डोळे भरून घ्यायचे, ऐकवेल त्या संगीतानं कान तृप्त करायचे, ऊन, थंडी, पाऊसवाऱ्यानं शरीरातल्या धमन्या पुनरुज्जीवित करायच्या, नतमस्तक व्हायचं आणि परतायचं....परत त्याच्याच कुशीत जाण्यासाठी…!!!

Sunday, April 12, 2020

राजगड ते शिवथरघळ - एका पुण्यभूमीवरून दुसऱ्या पुण्यभूमीवर

राजगड ते शिवथरघळ - एका पुण्यभूमीवरून दुसऱ्या पुण्यभूमीवर

-- सौरभ जोशी

पहाटे चारच्या सुमारास गुंजवणीत कोंबडं आरवलं. त्या आवाजानं डोळे किलकिले उघडले. रात्रभराच्या प्रवासाचा शीण, त्यामुळे स्लीपिंग बॅग मध्येच चुळबुळ चालू होती. सरत्या पौषाचा आठवडा. बाहेर बऱ्यापैकी असलेल्या थंडीमुळं गुरगुटून झोपावंसं वाटत होतं. शेवटी आळस झटकून उठलो आणि मंदिराच्या सभामंडपात झोपलेल्या सवंगड्यांना देखील हलवलं.

तांबडफुटी झाली. गुंजवण्याच्या दक्षिणेस पहुडलेली राजगडाची सुवेळा माची आणि तिच्या पूर्वेकडील असलेल्या तोंडाजवळचं नेढं लक्ष वेधून घेत होतं. पाखरं जंगलात किलबिलायला लागली. कुणी घरटी बांधायला काड्या-पानं आणायास तर कुणी त्यांच्या पिल्लांसाठी दाणापाणी वेचायास घरटी सोडती झाली. 

आम्ही देखील झरझर आवरायला लागलो. आजचा पल्ला तसा बराच होता. राजगडी जाऊन, अख्खा किल्ला पाहून पुढं कुंभळ्यापर्यंत मजल मारायची होती. पुरोहिताकडचा चहा मारला आणि फार वेळ न दवडता पाठपिशव्या पाठीस ठासून आम्ही चोरदिंडीच्या वाटेस लागलो.

सूर्याची कोवळी सोनेरी किरणं सुवेळावर सांडली. उजवीकडे बालेकिल्ला कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला. वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न होतं. गावातले बापे कंबरेस कोयती लावून शेतांच्या वाटांवर दिसू लागले. विहिरींवरील रहाटांचा कर्रकर्र आवाज गावातल्या आया-बहिणी पाणी भरण्यास आल्याचे दाखवत होता. गाव पूर्ण जागं झालं होतं.

गुंजवण्यातून चोरदिंडीकडे जाणाऱ्या वाटेवरील पहिल्या दांडास भिडलो. मी, गायत्री, पाणिनी, प्रणव, मकरंद आणि प्रीती असा जिवलगांचा चमू होता. त्यामुळे गप्पा गोष्टी करत, हसतखेळत मार्गक्रमण चालू होते. गुंजवणी आणि कानंदीचं खोरं आता सूर्यप्रकाशात लख्ख दिसत होतं. पहिला दांड चढून टेपावर आलो. डावीकडे राजगडाच्या सुवेळा आणि पद्मावती माचीच्या मधल्या अजस्र अंगावर पसरलेली गच्च रानराई, दोहींच्या वरच्या अंगास अचल असा बालेकिल्ला, पश्चिमेस तोरणा, त्याच्या झुंझार आणि विशाळा माच्यांना घेऊन मिरवत उभा, तर उजवीस उत्तरेकडे दूरवर पसरलेल्या ढगांच्या दुलईतून डोकी उभवणारे सिंहगड, पुरंदर-वज्रगड. न्याहारीसाठी याहून सुरेख जागा कशास हवी? 

गायत्रीला तिच्या पाठपिशवीतुन बांधून आणलेली न्यहारी काढायला सांगितली. पाच-एक मिनिटं पाठपिशवीत शोधून गायत्रीला साक्षात्कार झाला की न्याहारीची पिशवी खाली गुंजवण्यातंच राहिलीय. बोंबला….!! आता काय करायचं? प्रणवने त्याच्या स्टाईलमध्ये तिला सोलली. पण तिला सोलून लागलेली भूक थोडीच भागणार होती? परत खाली तासभर उतरून जाणं शक्तीच्या दृष्टीने असलं तरी वेळेच्या दृष्टीने परवडणारं नव्हतं. झाक मारत बरोबर आणलेली बिस्किटे, चकल्या इत्यादींवर वेळ मारून नेली आणि चालते झालो. 

चोरदिंडीच्या अलीकडे अंगावर येणाऱ्या सोंडेचा चढ सुरु झाला. दमछाक तर होत होतीच. पण शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली राजगडाची पवित्र भूमी एका अनामिक ओढीनं खेचत होती. मधले कातळटप्पे पार करून चोरदिंडीत आलो. चोरदिंडीच्या दगडास डोकं टेकलं आणि किल्ल्यात शिरते झालो. पद्मावतीच्या तलावाबाजूनं चढून माचीवरच्या आई पद्मावतीच्या मंदिराशी येऊन थांबलो. दर्शन घेतलं आणि लागलीच निघालो. 

सदर, दारूखाना मागे टाकून बालेकिल्ला, सुवेळा आणि संजीवनी यांच्याकडे घेऊन जाणाऱ्या वाटांच्या तिठ्याशी पोचलो. तिथं एक पोरगं ताक विकायला आलेलं. त्याला विचारलं “खुटून पावला?” तशी म्हणाला “भुतोंड्यावरच्या वाटेवर ढिब्यांचा धनगरवाडा हाये, थितून आलू.” आम्हाला पुढे भुतोंडेमार्गेच कुंभळ्याला जायचं होतं. त्यामुळे त्याला सांगितलं की आम्हाला भुतोंड्याच्या वाटेला जाता जाता लावून दे. चालेल म्हणाला. “आम्ही बालेकिल्ला आणि सुवेळा पाहून येतो. साधारण दोन-अडीच तासांनी इथेच या तिठ्याशी भेट” असं त्याला सांगून आम्ही लागलीच बालेकिल्ल्याची वाट धरली.             

उजवीकडे बालेकिल्ल्याचा कातळकडा, डावीकडची
दरी दाट जंगलानं शाकारलेली, तीत लपलेला गुंजवणे दरवाजा, पूर्वेस भक्कम तटबंदीच्या कवचकुंडलांनी सजलेला सुवेळा माचीचा दांड, आणि माथ्यावर झाडोरीची महिरप, अशी बालेकिल्ल्याकडे नेणारी गोजिरी वाट. बालेकिल्ल्याच्या दरवाज्याशी पोचलो. कमानीतून सुवेळा निरखली. सह्याद्रीत अशी काही ठिकाणं आणि त्यावरून दिसणारी दृश्य आहेत, जी कितीही वेळा पहिली तरी दर वेळी मिळणारा आनंद तसूभरही कमी होत नाही. राजगडाच्या  बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्याची कमान हे अशा ठिकाणांपैकीच एक आणि तीतून होणारं सुवेळा माचीचं होणारं दर्शन हे अशाच मनाला भुरळ पाडणाऱ्या दृश्यांपैकी एक…!!

बालेकिल्ल्यावरच्या अष्टमीच्या चंद्राच्या आकाराच्या तळ्यावर जरा विसावलो, मागे असलेल्या महादेवाच्या मंदिरात शिवशंकराचं दर्शन घेतलं, उजवीकडे असणारा बुरुज पाहिला. त्यावरून दिसणारी पद्मावती माची, पलीकडे वेल्हे, साखर, विंझर पर्यंतचा मुलुख डोळ्यात साठवला, पलीकडे दिसणाऱ्या सिंहगडास साद दिली आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर आलो. चहूबाजूस ताशीव कडे, पूर्वेस चकाकणारं भाटघर जलाशयाचं पाणी, दक्षिणेस पार महाबळेश्वर-रायरेश्वर-मधुमकरंद गडापर्यंत पसरलेल्या सह्याचलाच्या रांगा, पश्चिमेस अनुपम स्थापत्यशास्त्राचा मेरुमणी म्हणून शोभणारी संजीवनी माची, त्यापल्याड तोरण्याच्या बुधला-विशाळापर्यंत जाऊन टेकलेली मळवाट, आणि उत्तरेकडे कोंढाणा असा सह्याद्रीनं चहू बाजूस मांडलेला विस्तीर्ण पट....तो डोळ्यात साठवला आणि बालेकिल्ल्यावरून उतरणीस लागलो. पुन्हा तिठ्याशी येऊन सुवेळाची वाट धरली. डुबा, हत्ती खडक, नेढे आणि पूर्वेकडचा बुलंद बुरुज पाहून परत तिठ्याशी आलो. ढिब्यांकडचं पोरगं थोड्याच वेळात आलं. दुपारचा एक वाजून गेलेला. गायत्रीच्या कृपेने झालेल्या सकाळच्या अपुऱ्या नाष्ट्यामुळे आता पोटात कावकाव सुरु झालेली. सुदैवाने दुपारचं जेवण तिच्याकडे दिलं नव्हतं..!! तिथेच एका झाडाखाली बसून जेऊन घेतलं आणि निघालो. 

थंडीचे दिवस असले तरी सूर्य आता माथ्यावर येऊन आग ओकत होता. पण सह्याद्रीच्या कुशीत आणि राजगडाच्या पुण्यभूमीत आम्ही होतो. त्यामुळे उन्हाच्या तलखीचा विसर पडला होता. एकमेवाद्वितीय अशा दुहेरी तटबंदीचे, अजोड बुरुजांचे, आणि व्याघ्रमुखाचे दागिने लाभलेल्या संजीवनी माचीवर आलो. ती घडवण्यात राबलेल्या असंख्य कारागिरांच्या हातांना मनोमन वंदन केलं आणि अळू दरवाज्यातून बाहेर पडून राजगडाचा निरोप घेतला. संजीवनीच्या बुलंद तटबंदीच्या बाजूने समांतर जाऊन ही वाट माचीच्या पश्चिम बुरुजाच्या बुंध्याशी येते. तिथून पश्चिमेकडल्या सोंडेवरून उतरून कोल्हे खिंडीमार्गे तोरण्याकडे जाते. तर दक्षिणेकडील सोंडेवरून उतरून ढिबे मामांच्या धनगरवाड्यामार्गे पुढे भुतोंड्यास जाते. आम्ही भुतोंड्याची वाट धरली.

पाऊणएक तासाच्या चालीनंतर ढिबे मामांच्या झापाशी आलो. कुडाच्या भिंती, गवतकाड्यांनी शाकारलेलं छत, आत एक तान्हुलं लुगड्याच्या झोपाळ्यात निजलेलं, समोर गुरांचा गोठा, त्यात असलेल्या वासराच्या गळ्यातल्या घंटीचा किणकिण आवाज, आणि मागल्या बाजूस राजगडाचा बुलंद पहारा. मनास बघता क्षणी भुरळ पाडणारी जागा.. त्या झापाशी जरा टेकलो. घसा ओला केला. धनगराच्या घरचं अमृत म्हणजेच ताक...सगळ्यांनी मिळून ताकाचा हंडा घशाखाली रिता केला आणि भुतोंड्याच्या वाटेस लागलो. संजीवनीच्या खालतें दोनतीन टेप उतरून डांबरी रस्त्याला लागलो. कोल्हे खिंडीतून भुतोंड्याकडे येणारा हा रस्ता. तोच धरून साधारण पाचच्या सुमारास भुतोंड्यास पोचलो. 

गावात कुंभळ्याकडे जाण्यासाठी चौकशी केली. पण गावकर्यांचं म्हणणं पडलं की यापुढं निघून काळोखाच्या आत पोचणं कठीण होईल. त्यामुळं आज इथेच राहा आणि सकाळी लवकर निघा. गावकऱ्यांचा सल्ला मानून आम्ही गावातच राहण्याचा निर्णय घेतला. गावाबाहेरच्या शाळेच्या पडवीत डेरा टाकला. भानुराज अस्ताच्या मार्गावर गेले आणि इथे आमच्या चमूमधील मधील आचारी पाणिनी आणि प्रणव स्वयंपाकास भिडले. सूप आणि खिचडीचा बेत झाला. जेवल्यावर शाळेसमोरच्या अंगणात चांदणगप्पा रंगल्या. नीरव शांततेत स्लीपिंग बॅग मध्ये शिरून झोपलो.

पहाटे चारच्या सुमारास जाग आली. शाळेचं अंगण स्वच्छ चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेलं. पाणिनीला उठवलं आणि म्हटलं “चल, राशिदभाईंचा अहीरभैरव ऐकू.” त्यालाही कल्पना आवडली. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात, त्या पहाटेच्या वेळी, नीरव शांततेत राशिदभाईंची ‘अलबेला सजन आयो…’ ही अहीरभैरवातली बंदिश वातावरणात वेगळंच चैतन्य भरत होती. त्या समाधीतून आम्ही दोघे बाहेर आलो तेव्हा पाच वाजत आलेले. सगळ्यांना उठवलं. आवराआवर करून थोडं फार खाऊन सहाच्या ठोक्याला निघालो.

दहा हत्तीचं बळ असलेल्या रणमर्द येसाजी कंकांचं भुतोंडे गाव. त्यांचे वंशज अजूनही भुतोंड्यात आहेत ही माहिती होती. गावात त्यांचं घर शोधून काढलं आणि भुतोंडे सोडण्यापूर्वी एका अविस्मरणीय अनुभवाचे साक्षी झालो. येसाजींच्या घरात जे त्यांच्या वंशातले गृहस्थ होते, त्यांनी येसाजींची सात ठोक्यांची तलवार दाखवली. पूर्वी सरदाराची तलवार हे त्याच्या रणांगणातल्या पराक्रमाचं मोजमाप होतं. शंभर गनीम मारले की तलवारीच्या मुठीवर एक ठोका पडत असे. असे त्या तलवारीवर सात ठोके होते. त्यावरून येसाजींच्या पराक्रमाची कल्पना यावी.
जी तलवार आम्हाला हातात धरणं जड जात होतं, ती घेऊन लढणाऱ्या येसाजींची ताकद काय असावी, हे आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. येसाजींना आणि त्यांच्या त्या सौदामिनीप्रमाणे लखलखणाऱ्या तलवारीला सादर वंदन करून आम्ही कुंभळ्याच्या वाटेस लागलो.

गावाबाहेरची एक छोटी तर पार कडून पलीकडे गेलो. पलीकडचा डोंगर चढून, थोडी सपाटीची वाट तुडवून कुंभळे गावाच्या अलीकडे असलेल्या डोंगरमाथ्यावर आलो. इथून लांबवर गोप्या घाटाची माथ्यावरची खिंड दिसू लागली. आम्हाला तिथेच जायचं होतं. म्हटलं चला, गोप्या घाटाची खिंड दिसायला लागली, तिथून उतरलो की पोचलोच शिवथरी…!!! भराभर पावलं टाकत ती डोंगराची उतरण पार केली आणि कुंभळ्यात पावते झालो. पन्नाससाठ उंबऱ्यांचं गाव. तिथेच एका घराच्या ओसरीत स्टो मांडला आणि झकास उपमा केला. त्याच घरात एका बकरीनं अगदी अर्ध्या तासापूर्वी एका कोकराला जन्म दिला होता. त्याची नाळ देखील अजून पडली नव्हती.
त्या गोंडस कोकराला कुरुवाळलं आणि गोप्या खिंडीकडे निघालो.

वाटेत एका शेतात एक गावकरी औत घेऊन नांगरणी करत होता. पाणिनीला काय खाज आली कोण जाणे. त्याने त्या गाववाल्याला विनंती केली मी थोड्या वेळ औत धरू का? तो गावकरी पण महान..! त्याने हो म्हटलं आणि पाणिनीने औत धरला. दोन चार पावलं धड चालला असेल. त्या बैलांना बहुधा आपल्याला एका बैलानेच धरलंय याची जाणीव झाली असावी. ते क्षणार्धात उधळून वेडेवाकडे धावत सुटले आणि चक्क आमच्याकडे यायला लागले. पाणिनी मागे औत धरून बैलांमागे पळतोय, आम्ही बैलांपासून बचाव करायला जीव मुठीत धरून धावतोय, आणि तो गावकरी त्या बैलांना पकडण्याकरता त्यांच्यामागे पळतोय, असं मजेशीर दृश्य होतं ते.,..आज ते आठवलं की मजेशीर वाटतं, पण तेव्हा आमची सगळ्यांचीच पार तंतरलेली..!!

तासाभरात गोप्या घाटाच्या माथ्यावर खिंडीशी आलो. म्हटलं वा, आता थोड्याच वेळात घाट उतरला की शिवथरी पोचू…!! पण गोप्या घाटाच्या माथ्यवरून दिसलेल्या दृश्याने आपला अंदाज सपशेल चुकला आहे याची जाणीव झाली आणि घसा कोरडा पडला. दरीत लांबवर कुठेतरी शिवथर गावाची घरं बारीक टिम्ब दिसावीत तशी दिसत होती. ते पाहून ट्रेक लवकर संपवून घरी लवकर पोचू हे कल्पनेतलं चित्र पार विरून गेलं. पण आता परतीचे दोर कापलेले होते. मागल्या बाजूस राजगडाचा बालेकिल्ला कुठल्याकुठं दिसत होता. प्रणवने किती चालवतोयस म्हणून मला यथेच्छ शिव्यास्नान घातलं. जवळंच एक पाण्याचं छोटं कुंड होतं. त्यातलं नितळ थंडगार पाणी तोंडावर मारलं. अजून किती भयंकर उतरून जायचं आहे या जाणिवेच्या पार्श्वभूमीवर  त्या अमृततुल्य पाण्याने जरा दिलासा दिला. आम्ही उतरायला लागलो. दुपारच्या टळटळीत उन्हात या घाटातल्या वाटेवरचं गच्च जंगल सुखावह वाटत होतं.  

अडीच तासांच्या उतरणीनंतर गोप्या घाटाच्या पायथ्याच्या सपाटीवर आलो. आता लवकरच शिवथरघळीत पोचू या विचाराने झालेला आनंद, शिवथरघळ अजून पाच किलोमीटर लांब आहे या एका गावकऱ्याने दिलेल्या माहितीने मावळून गेला. तसंच स्वतःला रेटत रेटत एकदाचे शिवथरघळी पोचलो. 
सकाळी सहाला भुतोंड्यावरून सुरुवात केलेल्या पायपिटीची संध्याकाळची पाचला शिवथरघळी सांगता झाली. समर्थांच्या पायी पडलो आणि श्रम हलके झाले. आपल्या अचाट कर्तृत्वावर स्वराज्य स्थापना करणाऱ्या गडपती छत्रपतींच्या राजगड या पुण्यभूमीवरून सुरुवात केलेल्या खेची पण अनोख्या भटकंतीची, त्यांना अध्यात्मिक आणि मानसिक बळ देणाऱ्या त्यांच्याच गुरुवर्य समर्थ रामदासांच्या पुण्यभूमीत सुखरूप सांगता झाली होती. आम्हा लेकुरवाळ्यांच्या अनुभवांच्या, आनंदाच्या आणि अविस्मरणीय अनुभूतींच्या इवल्याशा शिदोरीत त्या सह्याद्रीनं पुन्हा एकदा भर घालून तो शिवथरच्या मागे अचल अवस्थेत उभा होता. त्याचे आणि समर्थांचे मनोमन आभार मानले आणि घराचा रस्ता धरला.

Wednesday, April 1, 2020

अहुप्यावरच्या टेंटमधलं तळं…!!

अहुप्यावरच्या टेंटमधलं तळं…!!!                     -- सौरभ जोशी


“अरे ए सौ, स्लिपिंग बॅग मध्ये पाणी शिरलंय”, रात्री २ च्या सुमारास टेंटमध्ये अम्या चुळबुळ करत उठत म्हणाला. गुरफटून घेतलेल्या स्लिपींग बॅग मध्ये कोंबलेलं अंग कसंबसं बाहेर काढत मी उठून पाहिलं. टेंन्टच्या वॉलचेन मधून थंड पाणी आत आलेलं. आषाढ अगदी जोमात होता. बाहेर पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं. अहुप्याच्या कातळकड्यापासून शंभरएक मीटरवर आमचा टेंट फडफडत कसाबसा तग धरून होता. वारा नुसता भराटल्यागत घोंगावत होता. टेंटच्या खिडकीतून डोकावून वर पाहिलं. सुदैवानं आऊटर आणि टेंटचं नातं अजून शाबूत होतं. 


माझ्या बाजूला महेश उर्फ कालिया आणि पलीकडे प्रतीश श्वासांना खर्ज लावून शांत (??) झोपले होते. निसर्गानं टेंटच्या आत घुसून आमच्यावर केलेल्या सिंचनाची त्यांना कल्पनाच नव्हती. 


“अम्या, कसले कुंभकर्णासारखे झोपलेत रे हे दोघं”, इति मी.
“थोतरीत ढुशा देऊन उठव त्यांना…” अम्या बोंबलला.
“अरे झोप ना शांत”, प्रतीश झोपेतंच गुरगुरला. 
“अरे झोप काय? इथं टेंटमध्ये तळं झालंय आणि तुम्हाला झोप कशी येतेय..” अम्यानं सत्य परिस्थितीची जाणीव करून देत म्हटलं. प्रतीश आणि महेश डोळे चोळत उठले.


बाहेर किर्रर्र काळोख, फूटभरावरचं देखील दिसणार नाही असं धुक्याचं साम्राज्य, बेभान पावसाकडून टेंटच्या छतावर वाजत असलेले ताशे...अशा परिस्थितीत बाहेर जाणार कसं? ...आणि जाऊन तरी काय कप्पाळ दिवे लावणार? बरं, अहुपे गावात एखाद्या झापात जाऊन पडावं तर ते ही दोन फर्लांग लांब. गपचुप टेंटमधेच जे काही कोरडं मिळेल त्याने आतून टेंट पुसला आणि कशीबशी रात्र रेटली.


माझ्या नुकत्याच नवीन घेतलेल्या टेंटची स्ट्रेस टेस्ट
घेण्याकरता ऐन आषाढात केलेल्या तिरंगीघाट-अहुपे-अहुपेघाट या ट्रेकमधला हा प्रसंग. वरुणराजानं घेतलेल्या या परीक्षेत माझा टेंट सपशेल नापास झालेला. पण नापास होता होता अनुभवांच्या शिदोरीत एका अविस्मरणीय प्रसंगाची नोंद करून गेला.


सकाळच्या पहिल्या कर्जत लोकलने मी, अम्या, कालिया आणि प्रतीश कल्याणला उतरलो. लगेचंच लालडब्याने मुरबाड गाठलं. तिथून धसई-पळु मार्गे रामपुरी आलो. हा परिसर म्हणजे देशावरून खाली कोकणात उतरणाऱ्या डोंगरवाटांची मांदियाळीच आहे. इष्ट्याच्या वाडीतून ढाकोब्याच्या पोटातनं चढणारा ईष्ट्याचा दरा किंवा दाऱ्या घाट, रामपूरच्या पूर्वेस असणाऱ्या दुर्ग किल्ल्याच्या कातळभिंतीवरून येंगणारा खुट्याचा दरा, त्याच्याच बाजूला रामपुरातून डोणी गावात चढणारा डोणीचा दरा किंवा त्रिगुणधारा घाट किंवा तिरंगी घाट, खोपिवलीतून देशावर जाणारा अहुपे घाट, पुढे सिद्धगडाच्या बाजूनं चढणारा भटीचा घाट, असे अनेक पुरातन घाटमार्ग या परिसरात डोंगरभटक्यांना खुणावतात. त्यातल्या त्रिगुणधारा घाटाने आम्ही चढणार होतो,
पुढे डोणी मार्गे अहुप्यास जाऊन अहुप्याच्या पठारावर टेंटमध्ये मुक्काम, आणि अहुपे घाटाने खाली खोपिवलीत उतरणार होतो.


रामपुरातून वाटाड्या घेतला. म्हणाला “खुटं जायाचं पावनं ?” 
त्याला म्हटलं “मामा, वरती डोणीपरतुर जायचं हाय....जरा डोणीच्या दऱ्याला लावून द्या, म्हंजी झालं. फुडं आमी जातु..”
त्यावर तो गप्प झाला. म्हटलं “काय झालं मामा?”
“आवं, आसाडामदी येवड्या पावसात कशापायी जाताव थीतून? पानी निस्तं धबाधबा अंगावर येतया.” इति मामा.
पण आमची खाज कुठे जिरत होती. आम्ही म्हटलं, “मामा, काळजी नका करू. आम्ही जाऊ नीट.”
मामा तयार झाले. आम्ही निघालो.


आषाढ सुरु होऊन पंधरवडा सरलेला. त्यामुळे लावण्या होऊन रोपांनी चांगला जम धरलेला. दुतर्फा शेतांतून एकसारख्या पातळीवर येऊन ती डोलायास लागली होती. वाट
मिळेल तसे धावणारे लहानमोठे पाट त्यांना पाणी पुरवत होते. बूट कोरडे ठेवण्यासाठी वाटेतलं पाणी चुकवून दगडांवरून चालण्याचा प्रयत्न आम्ही कधीच सोडून दिलेला. रामपूरची घरटी आता दिसेनाशी झाली. डावीकडे दुर्ग किल्ल्याची भिंत अर्धी धुक्यात होती, तर मागल्या बाजूस नानाचा अंगठा, जीवधन ही मंडळी अजूनंही स्वतःला धुक्यात लपवून होती. तो नजारा पाहून सहज ओळी सुचल्या…. 


“धुक्याच्या रे शाली, धवल दिसती उंच अचली,
पहा ल्याली पृथ्वी, हरिततृणमाला मखमली.
प्रपातांच्या धारा, पडति धरणीच्या कर-तली,
सजे सृष्टी कैशी?, जणु नववधू आज नटली.”

समोर डोणीच्या दर्याची नाळ हळूहळू जवळ येत गेली. तिच्या माथ्याजवळ पडणारा अजस्र प्रपात वातावरणातील चैतन्यात भर घालीत होता आणि त्याचबरोबर किती चढायचंय याची जाणीव करून देत होता. साधारणतः तासभर शेतांच्या बांधांवरून, अवखळ पाटांमधून, चिखलमातीतून वाट तुडवून अखेर नाळेला भिडलो. मामांचा निरोप घेतला. वाट आता चांगलीच अंगावर येणारी झाली. 


माथ्याजवळच्या त्या धबधब्याचं पाणी नाळेतील भल्या मोठ्या खडकांवर आपटत एखाद्या व्रात्य मुलाप्रमाणे उड्या मारत
येऊन आम्हाला नखशिखांत भिजवत होतं. त्यात थयथयाट करणारा पाऊस पाण्यात अजून भर घालत होता. धबाबा वाहणाऱ्या पाण्यानं खडकांवरल्या आधाराच्या खोबणी देखील लपवलेल्या. पण करणार काय? तसंच खळाळत्या पाण्यात हात घालून थोडं चाचपून खोबणी शोधून पाणी अंगावर घेत आमची चढाई चालू होती. माझ्या पाठपिशवीत कपडे, थोडा शिधा, आणि त्याबरोबर टेंट ची गुंडाळी. त्यामुळे वजन आता खणखणीत बोलू लागलं होतं. जवळ-जवळ सत्तर-ऐंशी कोनातल्या नाकात दम आणणाऱ्या त्या चढाईमुळं आणि पाठीवरच्या वजनामुळं एक एक पाऊल टाकणं देखील मध्ये मध्ये नको होत होतं. माथ्याशी धुक्याच्या ढगांची ये-जा चालू होती. त्यात त्या धबधब्याचा लपाछपीचा खेळ अविरत चालू होता. त्याचं चैतन्य आम्हाला वर खेचत होतं. जणुकाही तो खळाळत आम्हाला सांगत होता, 
“या पोरांनो, सावकाश या. निसर्गातलं
अनुपम चैतन्य हाती घेऊन मी उभा आहे इथं तुमच्या स्वागताला...ते चैतन्य तुम्हावर ओतून तुमचे श्रम मी हलके करीन...या ...या…”. ती त्याची साद आम्हाला वर चढवीत होती.     


सुमारे दोन-अडीच तासांच्या खेची चढाईनंतर त्या एकमेवाद्वितीय प्रपाताच्या बुंध्याशी जाऊन आम्ही पोचलो. अहाहा...दोन-अडीचशे फुटांवरून फेसाळत पडणारी त्याची ती धार, जणू वैशाखाच्या तलखीनं तापलेल्या सह्याद्रीचं अंग शांत करण्यासाठी निसर्गानं ओसंडवलेला धवलशुभ्र क्षीरप्रपात....!! विलक्षण सौंदर्य...अलौकिक ऊर्जा...त्याच्या बुंध्यात पडून परत उडणाऱ्या उत्फुल्ल तुषारांनी सगळे श्रम कुठच्या कुठे विरून गेले. त्याच्या पोटात शिरून ते दणाणा पडणारं पाणी पाठीवर घेत सगळं शरीर हलकं करून घेतलं, आणि आम्ही डोणीकडे मार्गस्थ झालो. 


पंधरा-वीस मिनिटांच्या सपाट चालीनंतर डोणीत शिरते झालो. एका धनगराच्या राहुटीत टेकलो आणि जेवलो. पाठपिशव्यांनाच टेकून जरा विसा
वा घेतला आणि अहुप्याकडे निघालो. अहुप्यास पोचेस्तोवर दुपारचे साडेतीन चार वाजले. गाव मागे टाकून अहुप्याच्या पठारावर आलो. पाऊस हलकासा उघडलेला. म्हटलं लागलीच आपलं खोपटं बांधून घेऊ. अहुप्याच्या कड्यापासून शंभरएक मीटर अलीकडे एका छोट्या ओढ्याजवळ टेंट पीच करायला सुरुवात केली. तेवढ्यात रानातून गावाकडं जाणारी एक मावशी आली आणि म्हणाली,


“पोरानु, काय करताव?”


आम्ही म्हटलं, “मावशी, रातच्याला हितंच राहनार...जरा आमचं खोपटं बांधून घेतु..”


मावशी म्हणाली, “आवं, काय येडं की खुळं झालासा....रातच्याला ढग भूतावानी गडगडत्यात...आन पिसाळल्यागत पाऊस पडतुया...त्यामदी कशापायी राहाताव...गावामदी चला...माज्या घराबाजूस धनगराचा झाप हाये, थितं टाका तुमचा डेरा…”


..पण आम्ही खरंच खुळे होतो...नव्हे सह्याद्रीनं आम्हाला खुळं केलेलं...
पावसाळ्यातलं सह्याद्रीचं चैतन्य रोमारोमांत भरून घेण्यासाठी आम्हाला तिथेच राहायचं होतं. निसर्गाच्या भन्नाट आविष्कारांचे साक्षी होण्यासाठी असा खुळेपणा करण्याला पर्याय नाही. मावशीस म्हटलं, “काळजी नगं करूस...आम्ही राहू हितंच...”...आम्ही खरोखरीच वेडे आहोत असं समजून मावशीनं आम्हाला समजावण्याचा नाद सोडला आणि ती गावाकडं चालती झाली.


टेंट पिच करून झाला. टेंटची भिंत आणि आऊटर यांच्या मधल्या जागेत गुडघ्यावर उभं राहून कपडे बदलले...आणि त्याच जागी स्टो मांडला...फक्कड चहा केला...आणि कड्यावर बसून भुरके मारायला सुरुवात केली. अंदाजे साडेतीन चार हजार फूट उंचीवर पसरलेलं
विस्तीर्ण पठार. समोर दरीत झेपावणारे असंख्य धबधबे, डावीकडे शेताडी, तिवरून धावणारे बांध आणि त्या पल्याड पार भीमाशंकरापर्यंत गेलेली सह्याद्रीची रांग, मागे अहुप्याची कौलारू घरटी, उजवीकडे दुर्ग, ढाकोबा, जीवधन, खडा पारशी, नानाच्या अंगठ्यापर्यंत पहुडलेली सह्याद्रीची कातळरांग, सोबतीला धुक्यानं भरलेलं कुंद वातवरण आणि पार्श्वभूमीवर आजूबाजूस सैरावैरा पळणाऱ्या  अवखळ ओढ्यांचं संगीत...!! स्वर्ग म्हणतात तो यापेक्षा वेगळा असूच शकत नाही.  


पाऊस परत भरून आला. स्टो परत पेटवला. ओढ्यावरून पाणी आणलं..घरून भाजून आणलेली तांदूळ आणि मूगडाळ शिजत ठेवली..बाहेर पाऊस पिसाटल्यागत कोसळत होता. आम्ही आत गरमागरम खिचडी खालली
आणि थोड्या वेळात पहुडलो. पाऊस आणि ढगांच्या त्या दणदणाटात देखील पडल्या पडल्या झोप लागली. जाग आली ती टेंटमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे.स्लीपिंग बॅग ओली झाली तेव्हा. आपल्या टेंटचा पावसानं OTSDDP म्हणजे ऑन ड स्पॉट दणदणीत पोपट केलाय याची जाणीव झाली.


तशीच रात्र काढली. सकाळी उठून नाष्ट्याला गरमागरम चहा आणि मॅगी केली. रात्रभर कोसळून पावसानं सुदैवानं जरा विश्रांती घेतलेली. त्यामुळे कड्यावर बसून नाष्ट्याचा मस्त आस्वाद घेतला. आजूबाजूचा हिरवाईनं बहरलेला सहयाद्री डोळ्यात साठवून घेतला आणि टेंट वाइंड अप करायला घेतला. सगळी आवराआवर करून पाठपिशव्या परत खांद्यावर चढवल्या आणि
अहुपे घाटाच्या माथ्याकडे रवाना झालो. अहुपे घाट सुरु होणाऱ्या माथ्यावरून आम्ही राहिलेलो त्या पठाराचे आणि त्या जागेचे फोटो काढले. आपण अशा जागी राहिलो यावर विश्वास बसेना. ते दृश्य डोळ्यात साठवलं आणि खोपिवलीच्या वाटेवर उतरणीस लागलो.


आजवर त्या सह्याद्रीच्या आशीर्वादानं त्याच्या कुशीत भरपूर फिरलो. पण हाताच्या बोटांवरंच मोजता येतील असे काही ट्रेक होतात, ज्यांच्या स्मृती आठवणींचं मोहोळ कितीही धूसर झालं तरी ठळक राहतात. तशातलाच हा एक ट्रेक. सह्याद्री साद देतंच असतो....आपण त्याच्या सादेला निखळ मनानं “ओ” द्यावी, त्याचे आशिर्वाद घेऊन शरणभावानं त्याच्या अंगाखांद्यावर बागडावं....त्याच्या दालनातील स्वर्गीय नजारे पाहावेत, ते डोळ्यात साठवावेत....रंध्रारंध्रांत भरून घ्यावेत...ते दाखवल्याबद्दल सह्याद्रीचे मनोमन आभार मानावेत आणि त्याच्या पुढल्या सादेस पुन्हा “ओ” द्यावी. पुन्हा स्वतःला विसरण्यासाठी. हेच खरं…!!!