Tuesday, March 31, 2020

मुंबई पुणे आगगाडीचा प्रवास - एक सदाबहार अनुभव

मुंबई पुणे आगगाडीचा प्रवास - एक सदाबहार अनुभव
-- सौरभ जोशी

लहानपणी आजोळी जाण्याच्या निमित्ताने मुंबई - पुणे हा प्रवास आगगाडीने करण्याची वेळ बर्याचदा येत असे. पुढे आजी-आजोबा जसे ठाण्याला आले, तसं एकूणच पुण्याला जायच्या फेर्या कमी झाल्या आणि आगगाडीने जायचं तर दूरंच राहिलं.

पण आज बर्याच वर्षानी आगगाडीने पुण्याला जायचा योग येतो, नव्हे, तो मी आणतो. अगदी जाणूनबुजून आणतो. लहान मूल पहिल्यांदाच आगगाडीने प्रवास करण्यापूर्वी जसं हौसतं, तसा मी हौसतो. चार -पाच दिवस आधीपासून पुण्याला आगगाडीनं जायचंय असा मी घोषा लावतो. स्वत:च्या कारनं किंवा थेट बोरिवली - स्वारगेट बसनं न जाता मुद्दाम मी दादरहून सकाळच्या डेक्कन एक्सप्रेसने जायचं ठरवतो.

झालं...डेक्कन एक्सप्रेसचं खिडकीच्या सीटचं मी आरक्षण करतो. भल्या पहाटे उठून दादर स्टेशन मी अगदी गाडीच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच गाठतो. गाडी कधी एकदा स्टेशनात शिरतेय याची मी अगदी परळच्या दिशेने डोळे लावून अधीरतेने वाट पाहतो. मग दूरवर गाडीचं इंजीन दिसू लागतं आणि मला कोण आनंद होतो...आरक्षित केलेल्या खिडकीच्या सीटवर जाऊन मी बसतो, गाडी सुरू होते....आणि कधी एकदा कल्याण मागे टाकतोय असं होतं...कारण त्यापुढेच खर्या अर्थाने सह्याद्रीच्या संगतीनं आगगाडीचा प्रवास सुरू होतो.

बदलापुर, वांगणी आलं की जुन्या सवंगड्यांच्या भेटीची ओढ लागावी तशी मनाला सह्याद्रीतील दुर्गमित्रांच्या भेटीची ओढ लागते...आणि पहिली दृष्टीभेट होते ती चंदेरीशी...मी मनातूनच साद घालतो आणि खुशाली कळवतो... नेरळ येतं..लगेच दृष्टी पाठीमागच्या पेब किल्ल्याकडे जाते आणि त्याच्या अंगाखांद्यावर बागडून केलेली मनमुराद भटकंती आठवते. त्याच्याच बाजूला उभवलेलं माथेरानचं पठार मनाला भुरळ घालतं. नेरळ मागे लोटताना माथेरानला जाणारी निळ्या रंगाची इटुकली ट्रेन दिसते का याचा नकळत डोळे शोध घेतात.....आणि ती दिसली की लहानपणी जसा आनंद होत असे तसा तो मला आजही होतो.

मग हळूहळू जिभलीला पाणी सुटायला लागतं. कर्जतवरनं जणू हवेबरोबरंच वाहत आलेला बटाटावड्यांचा खमंग वास कर्जतला वडे वाट पाहत आहेत याची ग्वाही देतो..! कर्जत स्टेशनात गाडी थांबते. बटाटेवडे खात खात लक्षं लागतं ते गाडी कधी बरीकशी मागे-पुढे होते याकडे. कारण असतं, गाडीला मागच्या बाजूने अजून एक इंजिन लागण्याचं. ही moment मी आजही अगदी लहान मूल होऊन जगतो.
     
कर्जतहून गाडी सुटते...आणि मग काय पुढे आनंदाचा गाभाच..!! का काय विचारता? अहो, पुढे "कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी" या ओळी गुणगुणवायला लावण्यासाठी खंडाळा घाट असतो. मग तात्काळ डब्याच्या दाराकडे धाव घ्यायची आणि गार वारा अंगावर घेत सह्याद्रीचा पसारा मनसोक्त न्याहाळायचा.

आता ओढ लागलेली असते ती पहिल्या बोगद्याची. कारण तिथपासून पुढे २६ बोगदे बकायदा मोजायचे असतात. ते कधी कमी भरतात, तर कधी जास्त...पण ते मोजायची हौस मात्र १०० टक्क्यांपेक्षा तसूभरही कमी होत नाही...आणि कधी जर बरोब्बर २६ भरले तर तो आनंद आजही माझ्या गगनात मावत नाही..!! मी आता माझा नसायला सुरुवात झालेली असते.

मी आता दारातून सारखं मागे-पुढे पहायला लागतो. कुतूहल असतं ते, वळणावरनं गाडी जाताना पुढचं आणि मागचं इंजिन दिसतं का ते पहायचं..! बाकदार अळीसारखी ती गाडी आणि तिची ती पुढे-मागे अशी २ इंजिनं दिसली की अहाहा...काय ती मौज...त्यातून अगदी बाकदार वळणावर छोटा बोगदा आला की, बोगद्यातून पलीकडे पुढे गेलेले डबे, मग बोगद्यात गायब झालेली गाडी, अलीकडे गाडीचे बोगद्यात न गेलेले डबे, आणि सर्वात पुढे आणि मागे एक-एक इंजिन, असं मोठं गमतीदार दृश्य दिसतं...आणि मी खुळा होतो.

मग अनेक बोगद्यांतून बाहेर आल्यावर आपण केवढे उंच आलो आहोत याचा अचानक साक्षात्कार होतो ते बाजूस दिसणार्या  उल्हास दरीकडे पाहून..!! मध्येच दरीवर बांधलेले पूल, एकापाठोपाठ एक बोगदे, बोगद्यांमधील काळा कुट्ट काळोख, आत असलेले पिवळ्या रंगाचे दिवे, घाटातल्या चेक पोस्टवर लाल-हिरवा बावटा घेऊन उभा असणारा लाइनमन, मधुनंच एखादं लोणावळ्याला गाडीला सोडून परत कर्जतकडे मोठ्ठा भोंगा मारत आणि खणखणाट करत उतरणारं एकटंच इंजिन...हे सारं काही मला आजही मोहिनी घालतं..!

घाटातनं जाताना दरीच्या पलीकडे दिसणारे श्रीवर्धन आणि मनरंजन हे राजमाचीचे दोन बालेकिल्ले, पलीकडे कुसुरचं पठार, ढाक-बहिरीचा डोंगर, त्याला बिलगलेला कळकरायचा सुळका, मांजर दबा धरून बसलंय असा भास देणारा मांजरसुंभाचा डोंगर असा सगळा सह्याद्रीनं मांडलेला पट डब्याच्या दारातूनच निरखणं म्हणजे क्या बात है...!! सगळच खुळावणारं...संमोहनात टाकणारं...हृदयाला भिडणारं आणि जिव्हाळ्याचं...या सगळ्यांना मी मनातूनच नकळत मुजरा घालतो......पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर या सार्या  मंडळींकडे पाहताना वाटतं की, खरंच आपले मावळे यातनं चढता-उतरताना दिसले तर काय बहार येईल...या विचारांत माझी समाधी कधी लागते ते माझं मलाच कळत नाही...कारण आता मी अजिबात माझा राहिलेला नसतो.

बघता बघता खंडाळा येतं. खंडाळा स्टेशनचं तिकिटघर तिथं उल्हास व्हॅली आणि इतर अनेक ट्रेक्सच्या निमित्ताने काढलेल्या रात्रींची आठवण करून देतं. तिथं रात्री म्हटलेली धम्माल गाणी, टाकलेले पत्त्यांचे डाव, बाहेर धुवाधार पाऊस चालू असताना स्लीपिंग बॅगमध्ये गुरगुटून काढलेल्या रात्री, स्टेशनजवळ असलेल्या प्रथमोपचार केंद्राच्या पडवीत रात्री झोपलो असताना तिथे एका बाळाच्या जन्माच्या रडण्याने खसकन आलेली जाग आणि त्याच्या बापानं आम्हाला वाटलेले पेढे...सारं सारं मन:पटलावरून सरकायला लागतं आणि हसू येतं....मी त्या nostalgic ट्रान्समधून गचकन बाहेर येतो, तो चिक्कीच्या वासानं..!!...आणि मला कळतं, अरेच्चा!! लोणावळा आलं पण..!!
कर्जतचा बटाटावडा ते लोणावळ्याची चिक्की या २ बिंदूंत निसर्गानं आणि आठवणींनी माझ्यावर अलौकिक आनंदाची पखरण केलेली असते. त्यातून बाहेर यावसंच वाटत नाही.

गाडी लोणावळ्यातनं बाहेर पडली की मग मुंबई - पुणे रस्ता दिसायला लागतो. त्यावरची धावणारी वाहनं पाहून "ए, आपली झुकझुकगाडी बघ किती फास्ट जातेय" असं मी माझं मलाच सांगतो..!! या आनंदात लोहगड-विसापूरची जोडगोळी कधी दिसायला लागते ते कळंतंच नाही. मग हळुहळु "ते शहर पुणे, तेथे काय उणे" याची चाहूल लागायला लागते.

अशा या सार्या अवीट प्रवासाच्या आठवणी मी मनाच्या पेटीत बंद करीतंच पुणे स्टेशनवर उतरतो. मी पक्कं ठरवतो की, परत मुंबई - पुणे आगगाडीनं नक्की यायचं....मन विचारतं "कशाला?"...मी मनाला म्हणतो, "अरे वेड्या मना, खुळं होण्यासाठी रे..लहान मूल होऊन झिंगण्यासाठी रे...वय विसरण्यासाठी रे..!"

माझ्या आठवणीतलं नाडसुर

माझ्या आठवणीतलं नाडसुर 
-- सौरभजोशी

परवा काही जुने फोटो पाहताना नाडसूरच्या घराचा फोटो समोर आला आणि मन एकदम तीस-एक वर्ष मागे गेलं. नाडसुरशी आणि तिथल्या घराशी निगडित अनेक आठवणी मन:पटलावर जिवंत झाल्या.
उगवतीस पार लोणावळ्यापासून निघालेल्या बेलाग सह्याद्रीची कोराईगड, मृगगड, अनघाई, तैल-बैला, भोजा डोंगर, धनगड, सुधागड अशा दुर्गरत्नांनी नटलेली कातळभिंत, अन मावळतीस सरसगडाचा पहारा. त्यात जोडीस वाघजई घाट, गवळण घाट, पायमोडी घाट, सवाष्णे घाट, घोड दरा, बोरप्याचा दरा अशा घाटावरून कोकणात उतरणाऱ्या एक सो एक घाटवाटांची रेलचेल. अशा श्रीमंत सह्याद्रीच्या देखरेखीत वसलेलं, भोरच्या पंत प्रतिनिधींचं संस्थान असणाऱ्या सुधागडाच्या पायथ्याशी वसलेलं नाडसूर हे टुमदार खेडं म्हणजे आमचं मूळ गाव.
दो-चौ पैस वाडे, पाच-सहा बावड्या, तेवढीच राउळं, सत्तर-ऐंशी कौलारू घरं आणि दोन इटुकल्या शाळा, एवढाच काय तो गावाचा पसारा. लहानपणी सुट्टीत आणि काही निमित्ताने अधेमधे नाडसुरी जाणं होई. त्यात या परिसराशी जी नाळ जुळली, ती कायमचीच. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडण्याची गोडी लावली ती सुधागडानं. पाच वर्षांचा असताना कृष्णाच्या खांद्यावर थोडावेळ बसून, थोड्या वेळ चालत सुधागडी गेल्याचं स्मरतंय. त्यानंतर नाडसुरला कधीही गेलं की सुधागडी चालत वर्दी लावणं नित्याचंच झालेलं.
आमचं घर देखील अतिशय आटोपशीर...दुपाखी...गोंडस...टुमदार…!! दाराशी राखणीला आंब्याचे दोन रुख. त्यांच्या बुंध्याजवळ त्यांच्या दोन खोडांच्या बेचकीत मारून ठेवलेली लाकडी फळी. तीस येंगुन आम्ही घराच्या अंगणात शिरत असू. अंगणात छोटंसं तुळशी वृंदावन. त्याच्या बाजूस छोटं खळं. त्यात दारच्या आंब्याची सुकलेली पानं पडत, जी आम्ही शेकोटीसाठी सरपण म्हणून वापरत असू.
घरात शिरल्यावर लगेच ऊजवीस छोटी खोली होती. ती तात्या धर्मे यांची. आम्ही त्यांना तात्या आजोबा म्हणायचो. तात्या आजोबा आमच्या आजोबांचे बालपणापासूनचे मित्र. त्यांना घर नव्हतं. म्हणून आजोबांनी ही खोली त्यांना राहायला दिली होती. आम्हा कुटुंबीयांपैकी नाडसुरी कोणी नसताना तात्या आजोबांकडून घराचा सांभाळ होत असे आणि त्यांना राहायला छत ही मिळत असे. या खोलीसमोर इंग्रजी L आकाराची मोठी पडवी होती. त्यात आजोबांची कापडाचा झुपका लावलेली आरामखुर्ची होती. बाजूला सागवानी झोपाळा. L च्या कोनाशी मला वाटतं आजोबांनीच तयार केलेली लाकडी फळ्यांची कॉट आणि त्यांनीच विणलेली खाट होती. स्वयंपाकघर आणि पुढची L आकाराची पडवी याना संलग्न असलेल्या भिंतीत एक खिडकी होती. स्वयंपाकघरात चूल, जिन्नस ठेवण्यासाठी एकावर एक मारलेल्या लाकडी फळ्या, एक फडताळ, आणि देवघर. चुलीच्या बाजूस जळणासाठीची फळकुटं आणि फुंकणी. स्वयंपाकघराच्या बाजूस माजघर होतं आणि त्यातून माडीवर जायला जुनाट लाकडी जिना होता. त्यावरून कोणी चढता-उतरताना धप्प धप्प असा आवाज येई. मागल्या पडवीत काही गाई-म्हशी होत्या. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही मुलं धारोष्ण दुधाचे मानकरी ठरत असू. एका फळीवर आमच्या पणजीनं कैक वर्षांपूर्वी केलेल्या लिंबलोणच्याच्या फोडी शिल्लक असलेली एक चिनी मातीची बरणी ठेवलेली असे. तिच्या हाताच्या चवीची आठवण म्हणून. दर खेपेस त्यातले बोट-बोट भर लोणचे आम्ही अगदी वर्षानुवर्ष पुरवून पुरवून चाखत असू.
जेव्हा गाडी नव्हती तेव्हा नाडसुरला जाणं हा दोन दिवसांचा कार्यक्रम असे. आदल्या रात्री ठाण्यास आत्याकडे राहायला जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहाची ठाणा-नाडसुर एसटी पकडायची. ती दहा-साडेदहा पर्यंत नाडसुरी पोचत असे. हा प्रवास कंटाळवाणा असला तरीदेखील हवाहवासा वाटणारा. ठाण्याहून एसटी सुटली की कधी एकदा ती पाली सोडतेय असं व्हायचं.
पालीपुढे दोन-तीन किमी झाले की डांबरी रस्ता संपत असे आणि एकवीस गणपतीच्या घुमटीपासून एसटी नाडसुरचा कच्चा रस्ता धरी. या रस्त्यावरच्या आठवणी देखील मनात घर करून आहेत. एकवीस गणपतीवरून पुढे आलं की डावीकडे एका दांडावर पुई नावाचं कातवड्यांचं गाव दिसे. तिथेच रस्त्याच्या बगलेस एक छोटी चौकोनी बाव होती. तिचं पाणी प्यायचं नाही कारण तीत नारू किड्याचे जंतू आहेत असं आजी सांगत असे. पुढे रस्त्यावर दो-चार मोऱ्या होत्या. त्यातल्या काहींवर साकव होते, तर काहींवरचे पडून गेलेले. त्यामधून एसटी अक्षरशः खालच्या दातपडी नदीच्या पात्रात उतरून परत वर चढत असे. अशा वेळी आम्हाला एसटीचालक हिरो वाटे आणि आपण एसटी ऐवजी झुलणाऱ्या बोटीत बसलोय की काय असा प्रश्न पडून उरात धस्सं होई.
नाडसुरचे खरे वेध लागत ते पायरीच्या धसेपासून. पुईच्या पुढल्या माळावरून एसटी दांडकळत गेली की ही धस लागे. धसेचा चढ बऱ्यापैकी अंगावरचा होता. पुढे आमची गाडी आल्यावर तिने या धशीतून जाताना आम्ही खाली उतरत असू आणि एका झटक्यात गाडी न बंद पडता धशीतून चढली की आपल्याला बाबा म्हणून किती कुशल सारथी लाभलाय या विचारानं ऊर भरून येई…!! धशीतल्या चढावरल्या वळणावर आंब्याचा एक भला थोरला वृक्ष होता. पूर्वी कच्चा रस्ता देखील नसताना आजोबा-बाबा-काका वगैरे पालीहून जिन्नस डोक्यावरून चालत वाहून आणताना या आमरुखाच्या सावलीत घटकाभर थांबून गूळपाणी घेत. धशीतून एसटी वर आली की एसटीच्या उजवीकडील खिडक्यांत येऊन आपलं घर दिसायला लागलं का, ते आम्ही निरखत असू....आणि ते दिसलं की आनंद गगनात मावेनासा होई. आता मात्र कधी एकदा घरी जाऊन झोपाळ्यावर बसतोयसं झालेलं असायचं. पण रस्ता अजून काही संपत नसे. पुढे धोंडश्याकडे जाणारा रस्ता उजवीस सोडला की एका छोट्या टेपावर वैतागवाडी नावाचं छोटं गाव लागे. गावाचं नाव देखील अगदी समर्पक होतं. इतका प्रवास करून आता वैताग आलाय असंच जणू काही ते सांगत असावं. बास....आता अगदी पाच मिनिटांचा वेळ उरला या जाणिवेनं सगळा शीण निघून जाई.
वैतागवाडीच्या पुढे अगदी काटकोनात एसटी उजवी घेऊन नागेश्वराच्या तलावाच्या काठाने नाडसुरात शिरत असे आणि एका हापशीजवळ थांबत असे. आम्ही मुलं अमुक अमुक तारखेस येतोय हे आई-बाबांनी आजीआजोबांना किंवा तात्या आजोबांना महिनाभर आधी पत्राने कळवलेलं असायचं. एसटी पायरीची धस चढून वर आली की तिचं पिवळट-मळकट टप आणि उडणारा धुरळा आमच्या घराच्या मागल्या पडवीतून दिसत असे. त्यामुळे आम्ही येण्याच्या तारखेस ठाणा-नाडसुर एसटीच्या वेळेस आजीआजोबा हा धुरळा कधी उडतोय याकडे डोळे लावून मागल्या पडवीत उभे असंत. हा धुरळा आणि एसटी दिसली की आजोबा किंवा तात्या आजोबा बाहेर हापशीवर आम्हास आणायास येत. नागेश्वराहून एसटी पुढे येऊन हापशीच्या अलिकडे तिनं डावी घेतली की उजवीकडे घराच्या मागल्या पडवीत आलेली आजी आम्हाला एसटीतून दिसत असे. तिला एसटीतून हात करत हाक मारायचा कोण तो आनंद…!! एसटीतून उतरून एका विहिरीला आणि एका मोडक्या शाळेला वळण घालून आम्ही घराकडे येत असू. आजी दारात पायावर दूध-पाणी घालण्यासाठी तांब्याभांडं घेऊन आलेलीच असायची....आणि घरात शिरल्यावर तर मग काय आनंदाचा गाभाच…!!!
आजी-आजोबांनी तात्याबा मोडकांस नातवंडं येणार असल्याचं आधीच सांगितलेलं असायचं. ते आदल्या दिवशी येऊन पडवीत झोपाळा बांधून जात. का? तर घरात शिरल्यावर आम्हा मुलांची पहिली उडी त्या झोपाळ्यावर असे. तात्याबांकडे बैलगाडी होती. आम्ही आलो की स्वतः बैलगाडी घेऊन यायचे. मग त्यांच्याबरोबर तास-दोनतास छानपैकी बैलगाडीची सफर होत असे. आम्हालाही हाकायला द्या ना, असा आम्ही त्यांच्याकडे हट्ट धरायचो. ते ही आम्हाला मग थोड्या वेळ बैलगाडी हाकायला देत असंत. फार मजा यायची. 
तात्या आजोबा माझ्यासाठी प्रत्येक खेपेस नवीन विटीदांडू बनवून ठेवत असंत. माझ्या आयुष्यात ज्यांनी मला विटीदांडू खेळायला शिकवलं आणि मी ज्यांच्याबरोबर आयुष्यात प्रथम विटीदांडू खेळलो ते तात्या आजोबा म्हणजे आम्हा मुलांचा नाडसुरातील वृद्ध बालमित्र…!! सडपातळ बांधा असला तरी एके काळचं त्यांचं कमावलेलं शरीर होतं. त्यामुळे ते आम्हा मुलांबरोबर अगदी लीलया खेळत. त्यांच्याबरोबर विटीदांडू खेळण्यातला आनंद आता परत येणे नाही.
नाडसुरच्या घरातील दिवेलागणीच्या वेळच्या आठवणीं मनात आल्या की वाटतं कालचक्र परत तीस-पस्तीस वर्ष उलटं फिरावं आणि ते क्षण पुन्हा अनुभवावेत. आजी बाहेर तुळशी वृंदावनात दिवा लावत असे आणि आम्ही मुलं शुभंकरोति म्हणून पुढल्या पडवीतल्या झोपाळ्यावर परवचा म्हणायला बसत असू. बाहेर तुळशीवृंदावनात तेवणारा मंद दिवा, आम्ही झोपाळ्यावर परवचा म्हणत बसलेले, समोर कापडाच्या आरामखुर्चीत आजोबा काही श्लोक म्हणत बसलेले, आत स्वयंपाकघरात आजी चुलीशी बसलेली, चुलीवर तापत ठेवलेला तवा, त्यावर भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्या, चुलीतील निखाऱ्यांवर फुंकणीतून फुंकर मारल्याचा बाहेर येणारा आवाज, देवघराशी कोणीतरी वडीलधारी - बाबा म्हणा, काका म्हणा - घंटा वाजवीत आरती करीत बसलेले, उदाधुपाचा येणारा सुगंध, हे सारं तीस-चाळीस वॉटच्या मंद दिव्यात, आणि घराबाहेर किर्र काळोख..!! फार छान मन:शांती होती ती. आज वाटतं की, तीच खरी श्रीमंती होती. ते पवित्र वातावरण, त्या लहरी आजच्या आमच्या लखलखीत दिव्यांनी उजळलेल्या घरांत नाही मिळू शकत....असो.
मग गावातली वडीलधारी मंडळी आजोबांशी गप्पा मारायला येत. त्यांत झोपाळा लावणारे तात्याबा मोडक असंत, आजोबांना अत्यंत मानणारे विष्णु आप्पा गुरव असंत, नाना द्रविड असंत. या सर्वांच्या गप्पा झोपाळ्यावर बसून ऐकण्यात एक वेगळीच मजा होती.
तात्या आजोबा साप पकडण्यात अतिशय पटाईत होते. त्यामुळे परवचा म्हणून झाल्यावर आम्ही त्यांना त्यांचे साप पकडण्याचे अनुभव सांगण्यास भरीस घालायचो. त्याचबरोबर त्यांच्या तोंडून भाऊ काणे या बहाद्दराची गोष्ट ऐकणे म्हणजे पर्वणी असे. तात्या आजोबा आणि आमचे आजोबाही सांगत की, भाऊ काणे हा एकेकाळी नाडसुरातला शक्तिमान माणूस होता. पूर्वी म्हणे रामोशांच्या टोळ्या गावावर दरोडे टाकीत असंत. पण भाऊ काणे गावात आहे असं समजताच रामोशी गावात येत नसंत. दर वेळच्या नाडसुरच्या खेपेत सापाच्या आणि भाऊ काण्याच्या गोष्टी आम्ही अगदी मन लावून ऐकत असू. तात्या आजोबा त्या अशा काही रंगवून सांगत की ऐकत राहावंसं वाटे.
बहिरी, भैरोबा आणि नागेश्वर महादेव ही नाडसुरची ग्रामदैवतं. बहिरीच्या मंदिराबाहेर जवळजवळ तीस-चाळीस किलोच्या भल्या मोठाल्या दगडी गोट्या होत्या. आजोबा सांगत की, पूर्वी गावात शक्तिमान गडी कोण, हे आजमावण्याकरता ह्या दगडी गोट्या एक एक करून उचलून उजव्या खांद्यावरून मागे फेकण्याची स्पर्धा लागे. घराच्या बाजूसंच एका छोट्या माळावर श्रीदत्ताचं आणि गणपतीचं मंदिर होतं. त्या मंदिरातून दिवेलागणीस छान घंटानाद येत. त्याच माळावर आम्ही विटीदांडू, बॅडमिंटन वगैरे खेळल्याचं ठळक आठवतंय.
आजोबांबरोबर किंवा तात्या आजोबांबरोबर आजूबाजूला भटकणं म्हणजे मजा असे. त्यात कोणगावचं धरण होतं, ठाणाळ्याची प्राचीन लेणी होती, सुधागड होता. आजोबांबरोबर दोन-तीन वेळा सुधागडी गेल्याचंही आठवतंय. त्या रस्त्यानं जाताना आजोबा त्यांच्या लहानपणीच्या किल्ल्याशी निगडित आठवणी सांगत. त्या आठवून आजही डोळे पाणावतात. किल्ल्यावरील भोराईदेवीच्या मंदिरात रोज पाठ वाचण्याची जवाबदारी पूर्वापार आमच्याकडे होती. आजोबा दोन-तीन वर्षाचे असतानाच त्यांचं पितृछत्र हरपलेलं. त्यामुळे हा पाठ वाचण्याची जवाबदारी साहजिकच एकुलत्या मुलावर म्हणजे आजोबांवर लहानपणापासूनंच आली. आजोबा सांगत की, त्यांची आई म्हणजे आमची पणजी त्यांना दातपडी ओलांडून सुधागडाचा जंगलातला चढ जिथून सुरु होतो, तिथल्या मारुती मंदिराशी सोडत असे. तिथून आजोबा एकटेच किल्ल्यावर जात आणि पाठ वाचून संध्याकाळपर्यंत परत नाडसुरी घरी येत. मुंज झाल्यावरचं सात-आठ वर्षांचं ते पोर जंगलातून येकुटवाणं किल्ल्यावर जात असे...माऊलीस मागे सारून...त्या वेळी त्या माऊलीची आणि आजोबांची मनस्थिती काय होत असेल याची कल्पना करवत नाही. पण नाईलाज होता. त्यातून चार पैसे मिळत कुटुंबासाठी.
वाटेतलं मालुसऱ्याचं टाकं, मधली मोठी शिळा, तिसरा महादरवाजा, वरती एका दगडी पायरीवर देवीच्या घोड्याच्या पायाचा उमटलेला खुर, असं सगळं आजोबा दाखवीत असंत. त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी सांगत. ते सारं श्रवणामृत वाटे. किल्ल्यावरील भल्या मोठ्या तलावास ते एका दमात पोहत सोळा फेऱ्या मारीत. त्यांचं पोहणं देखील प्रेक्षणीय असे. उजव्या कुशीवर झोपून, उजवा हात डोक्याखाली घेऊन फक्त डाव्या हाताने वल्ही मारल्यागत ते अतिशय सहजतेने, पाण्याचा एकही थेंब उडू न देता पोहत. तलावाच्या पलीकडच्या तीरावर जाऊन कंबरभर पाण्यात उभे राहून संध्या करीत, आणि परत तसेच पोहत अल्याड येत. खूप छान दृश्य असे ते.
नाडसुरचा दुसरा एक आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणजे धोरांड्यात जाऊन झाडावरची करवंदे खाणे, आणि शिवाय झोळीत भरून घरी आणून आजीस देणे. आजी मग ती अर्धी अर्धी कापून, तिखट मीठ लावून, चुलीवर भाजलेल्या भाकरीबरोबर जेवताना देत असे. ती चव जगातल्या कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमधील कुठल्याही महागातल्या महाग पदार्थांना येणे नाही. कारण त्यात तिखटमिठाबरोबर आजीच्या सुगरणहातांतुन तिचं आमच्यावरचं प्रेमदेखील स्रवलेलं असे.
नाडसुरला घराच्या मोरीत कधी अंघोळ केलेली मला स्मरतंच नाही. पडवीत एक दगडी होती आणि तिच्याजवळ एक दगडी पाटा होता. त्यावर उभं राहून दगडीतलं पाणी तांब्यानं धबाधबा अंगावर घेण्यातली मजा आज कुठल्याच स्विमिन्ग पूल मध्ये येत नाही. तसंच घराजवळच्या किंवा नाना द्रविडांच्या विहिरीवर जाऊन रहाटाने पाणी काढून रहाटाला लावलेला पोहऱ्या थेट डोक्यावर रिता करण्यातली मजा शब्दांत कशी वर्णावी?
अशी सगळी ही मजा संपायचा दिवस म्हणजे परत मुंबईला जायचा दिवस उजाडला, की नकोसं व्हायचं. सकाळची ठाण्याहून आलेली एसटी दिवसा पालीला एक-दोन खेपा मारून संध्याकाळी साडेचारच्या सुमारास परत ठाण्याला जाण्यासाठी नाडसुरी येई. ती पायरीच्या धशीशी आली की उडणाऱ्या धुराळ्यावरुन समजत असे. मग आम्ही घरातून सामान घेऊन निघत असू. असं वाटायचं की, एसटी येऊच नये आणि धुरळा दिसूच नये. पण तो क्षण यायचाच. एसटीत बसून निघालो की मन खट्टू होत असे. त्यात मागल्या पडवीत टाटा करायला आलेले आजी-आजोबा, तात्या आजोबा एसटीच्या खिडकीतून बघवलेच जात नसंत.
आज आता काळाच्या धुरळ्यात ही सारी मंडळी उडून गेलीयेत. त्यांच्या आठवणींची साक्ष देणारं ते घर आता पडक्या अवस्थेत उभं आहे. आज या साऱ्या आठवणींनी मी जरा हळवेला झालोय. पु.लं. नी ‘हरितात्या’ या कथेत म्हटल्याप्रमाणे पाठीला डोळे फुटावेत आणि मागे पडलेल्या काचांच्या तुकड्यांत असंख्य प्रतिबिंब लखलखावीत, तसे आजी,आजोबा, तात्या आजोबा, तात्याबा मोडक, अप्पा गुरव, नाना द्रविड इत्यादी प्रभृती दिसायला लागतात आणि वाटतं की, त्या उडालेल्या काळाच्या धुरळ्यातून ही मंडळी पुन्हा प्रकट व्हावीत आणि ते मंतरलेले दिवस पुन्हा अनुभवता यावेत.....!!
....पण वर्तमानकाळ लगेच मनाला दंश करतो, हसू ही येतं, रडू ही येतं....आणि एकंच वाटतं....
आहा..!! ते सुंदर दिन हरपले, मधुभावांचे वेड जयांनी जीवा लाविले....!!!